सांगली पालिकेतील दोन्ही काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

सांगली - महापालिका निवडणुकीचा बिगूल  वाजला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपनेही स्वबळावर कंबर कसली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरी आयात उमेदवार घेणार नसल्याची घोषणा केली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे डझनभर नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत आणि भाजपलाही रेडीमेड नगरसेवकांची गरज लागणार आहे.

सांगली - महापालिका निवडणुकीचा बिगूल  वाजला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपनेही स्वबळावर कंबर कसली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरी आयात उमेदवार घेणार नसल्याची घोषणा केली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे डझनभर नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत आणि भाजपलाही रेडीमेड नगरसेवकांची गरज लागणार आहे.  या साऱ्यांच्या अंतर्गत बैठकाही सुरू आहेत. प्रभागरचनेनंतर यांचा उमेदवारीसह प्रवेश होणार असल्याची चर्चा मात्र सर्वत्र रंगत आहे. याला काही नगरसेवकांनी दुजोराही दिला.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीत भाजपने गेल्या काही निवडणुकांत चांगलीच इनकमिंग केली आहे. विशेषत: ग्रामीण पाया नाही, अशी टीका होत असतानाही त्यांनी जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. तसेच पंचायत समिती ते नगरपालिका, ग्रामपंचायतीसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  खेळात भाजपने चांगलीच बाजी मारली. त्यामुळेच जिल्ह्यात भाजप नंबर वन बनला.

स्थानिक आघाड्यांचा आधाराने मार्केट कमिटी, जिल्हा बॅंकेतही भाजपने बस्थान बसविले आहे. आता हा फॉर्म्युला महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याची चर्चा आहे. दोन आमदार शिवाय खासदार अशी भाजपची कागदावरील ताकदच मोठी दिसते आहे; मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी झाली तर  भाजपला निवडणूक सोपी जाणार नाही. कोणाचेच चित्र स्पष्ट नसल्याने अजून तर्क-वितर्कच सुरू आहेत.

चार प्रभागांचा एक प्रभाग असल्याने उमेदवारांना निवडणुकीच्या खर्चासाठीही दमदार पक्ष पाठीशी असावा असे वाटणे साहजिक आहे. ही सर्व परिस्थिती पाहता पालिका वर्तुळात आता ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी अवस्था अनेकांची आहे. त्यापैकी काही नगरसेवकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आज भाजपमध्ये जाणार असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यात काँग्रेसचे मिरजेतील तीन आणि सांगलीतील तीन नगरसेवक थेट चर्चेत आले आहेत.

भाजपला यापूर्वी रसद पुरवणाऱ्या राष्ट्रवादीतीलही काही जण आता भाजपच्या प्रेमात पडल्याचे चित्र आहे. काही जण तर आमदार सुरेश खाडेंच्या गाडीतूनही फिरताना आढळतात. राष्ट्रवादीतील दुफळीचा फायदा उठविण्यासाठी भाजपनेही मोठी ताकद लावली आहे. काही नगरसेवक भाजपच्या जाहीर कार्यक्रमातही दिसू लागले आहेत. चर्चेचे वावटळ असले तरी प्रभागरचना आणि निवडणुकीसाठी प्रभागनिहाय निघणाऱ्या आरक्षणांवर उमेदवारीचे इनकमिंग ठरणार आहे.

खडा टाकून अंदाज...
पालिका वर्तुळातील सत्ताधारी काँग्रेसचे काही ज्येष्ठ, तर काही कनिष्ठ नगरसेवकांनी खडे टाकून अंदाज घेण्यास सुरवात केली आहे. अर्थात नाव छापू नका पण आमचं ठरलंय असं बिनधास्त बोलयलाही ते कमी करत नाहीत. अर्थात भाजपची रणनीती पाहिली तर त्यांना  आयातीशिवाय पर्यायही दिसत नसल्याचे बोलले जाते.

Web Title: Sangli News corporators on way to BJP