वाळू अड्डे उद्‌ध्वस्त; ११ कोटींचा दंड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

कडेगावला जिल्हाधिकाऱ्यांची धाड - २५०० ब्रास उपसा; १५० ब्रास जप्त 

कडेगावला जिल्हाधिकाऱ्यांची धाड - २५०० ब्रास उपसा; १५० ब्रास जप्त 

सांगली/वांगी - वाळूवर पोसलेल्या वळू आणि सरकारी वळूंना धक्का देत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी कडेगाव तालुक्‍यात वाळू डेपो उद्‌ध्वस्त केले. वांगी वडिये रायबाग आणि शेळकबाव येथे रात्रीच्या अंधारात येरळा नदीतून होणारा बेसुमार वाळूउपसा उजेडात आणत, १५० ब्रास वाळू जप्त केली. या ठिकाणी नदीतून २५०० ब्रासहून अधिक वाळूउपसा झाल्याचा आरोप ठेवत या तस्करांवर तब्बल ११ कोटी रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची सचित्र माहिती देतानाच ‘मी हात टाकला तर ताकदीनेच टाकतो, त्यातून कुणी वाचत नाही’, असा सज्जड इशारा वाळू तस्करीत अडकलेल्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेला दिला. 

पहाटे साडेचार वाजता निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे यांच्यासह चौघांच्या पथकाने कोणत्याही स्वरूपाचा पोलिस बंदोबस्त न घेता अत्यंत धाडसी कारवाई केली. गौण खनिज विभागाची जबाबदारी ‘पेलणाऱ्या’ अपर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, कडेगावचे तहसीलदार, गावचे तलाठी या साऱ्यांना पत्ता लागू न देता या धाडी टाकण्यात आल्या. सुनील देशमुख, शक्ती देशमुख, गणेश साळुंखे, निवास सूर्यवंशी, मिलिंद साळुंखे (सर्व वांगी, ता. कडेगाव), विश्‍वनाथ रुपनूर, राहुल शिंदे, सतीश जगताप (वडिये रायबाग) यांच्याविरुद्ध नोटीस बजावण्यात आली आहे. 

कडेगाव येथील प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे आणि कुंडलचे तलाठी अत्तार यांच्यात वाळूप्रकरणी कारवाईच्या वादाने जिल्ह्यातील वाळू तस्करीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला. त्याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी योजना आखली. त्याविषयी ते म्हणाले, ‘‘त्रिगुण कुलकर्णी, राजेंद्र कचरे यांच्यासह चौघांनी आज पहाटे साडेचार वाजता वांगीत प्रवेश केला. त्यांना ट्रॅक्‍टरचा आवाज येत होता. त्या दिशेने ते गेले. काही ट्रॅक्‍टर उभे होते. त्यांचे व्हिडिओ घेत पुढे गेल्यावर शेतमजूर महिलांनी वाळूचे ट्रॅक्‍टर कुठल्या दिशेने येतात, याची माहिती दिली. येरळा नदीच्या दिशेने ते गेले. तेथे तीन ट्रॅक्‍टर सापडले. ते तत्काळ चावडीवर आणले. ते येतात कुठून याचा माग काढणे सुरू झाले. त्यानंतर येरळा नदीकाठच्या तस्करांनी वाळूउपशाचे अड्डेच बनवल्याचे उजेडात आले. सुनील देशमुख याच्याकडे ४० ब्रास वाळूचा साठा आढळला. शेजारीच शक्ती देशमुख याच्याकडे २० ब्रास वाळूसाठा सापडला. ही वाळू ओली होती. त्यामुळे ती आजच उपसलेली असल्याचे स्पष्ट झाले. तेथून दीड किलोमीटर अंतरावर चालत गेल्यानंतर येरळा नदीत भयानक दृश्‍य पाहायला मिळाले. नदीतून बेसुमार वाळूचा उपसा झाल्याचे स्पष्ट दिसत होते. पाणीउपशाचा जॅकवेल कोसळेल, अशा पद्धतीने वाळूउपसा केला आहे.’’

साळुंखे वस्तीवर साठा
ते म्हणाले, ‘‘साळुंखे वस्तीवर मोठा साठा असल्याचे कळल्यानंतर तिकडे मोर्चा वळवला. तेथे वाळूसाठ्याची आणि ट्रक भरण्याची जय्यत तयारी आहे. त्या ठिकाणचा पंचनामा करण्यासाठी कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना बोलावले. तेथे चाळणी, पाट्या सारे आहे. गणेश साळुंखे, निवास सूर्यवंशी आणि मिलिंद साळुंखे यांचे तेथे डेपो आहेत. त्यांना प्रत्येकी ६०० ब्रास वाळूची नोटीस बजावण्यात आली आहे. तेथून आम्ही वडिये रायबाग येथे पोचलो. तेथे विश्‍वनाथ रुपनूर याच्याकडे १० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे. राहुल शिंदे याच्याकडे १ जेसीबी व डंपर मिळाला. सतीश जगतापकडे २ ट्रॅक्‍टर  व १ जेसीबी मिळाला. त्याचा पंचनामा करून वाहने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती.’’ 

तहसीलदारांनी दोन तास फोन घेतला नाही
कडेगावचे तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी यांपैकी कुणीही सकाळी दोन तास निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांचा फोन घेतला नाही. यांपैकी नायब तहसीलदार नेमणुकीच्या ठिकाणी राहत नसल्याची माहिती मिळाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

आदेश देऊन दमलो
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘गेल्या दीड महिन्यापासून मी वाळू तस्करीविरुद्ध कारवाई करण्याविषयीचे आदेश देत आहे. तहसीलदारांना लेखी कळविले आहे; परंतु, काही होतच नव्हते. शेवटी या व्यवस्थेत काहीतरी दोष आहे, हे लक्षात आले. त्यामुळे स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. कडेगावचा विषय तापलेला असल्याने पहिल्यांदा तेथे हात घातला.’’

बिगर नंबरप्लेट वाहने
या कारवाईतील बहुतांश ट्रॅक्‍टर हे बिगर नंबर प्लेटचे आहेत. एका दुचाकीवर नंबरऐवजी अक्षरे लिहिली असून, दुसऱ्या दुचाकीचा नंबर ओळखू येत नाही. या प्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. 

कुंडलमध्ये छापा
दरम्यान, ही कारवाई सुरू असतानाच कुंडल (ता. पलूस) येथील वाळू तस्करीविरुद्ध फास आवळण्यात आला. तेथे स्मारकाशेजारी सुमारे ७० ब्रास वाळूसाठा होता. तो कारखान्यावर हलवण्यात आला. त्या ठिकाणी तो जप्त करा, असे आदेश दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तेथे ३० लाख रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. 

चॅलेंज म्हणून बिगर बंदोबस्त
'वाळूतस्करांवर कारवाईसाठी सशस्त्र पोलिस बंदोबस्त द्या,’ अशी मागणी करणारा प्रस्ताव अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्या प्रस्तावातील फोलपणा उघडा पाडत जिल्हाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांना आजचा छापा टाकताना कोणताही पोलिस बंदोबस्त घ्यायचा नाही, असे सांगितले होते. त्यांनी धाडसाने ही कारवाई केली. पहाटे साडेचार वाजता अंधारात तस्करांच्या घरात घुसून केलेल्या कारवाईने महसूल यंत्रणाही आता धास्तावली आहे. 

‘सकाळ’चा दणका
कडेगाव येथील प्रांत आणि तलाठ्यांतील वादाच्या व्हायरल व्हिडिओ क्‍लिप प्रकरणानंतर ‘सकाळ’ने ‘वाळूवर पोसले वळू अन्‌ सरकारी जळू’ असा दणका दिला होता. त्याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलीच, शिवाय या प्रकरणी ‘सशस्त्र पोलिस बंदोबस्त द्या,’ असा प्रस्ताव सादर करणाऱ्या अपर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या भूमिकेचाही खरमरीत समाचार घेतला. ‘प्रांत-तलाठी वाद चालू द्या, कारवाईपण करा,’ असे आवाहन ‘सकाळ’ने केले होते. त्याची आज सर्वत्र चर्चा होती.

वेट अँड वॉच, अजून दोन अड्डे
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘माझ्या रडारवर वाळूतस्करीचे तीन प्रमुख अड्डे आहेत. त्यांपैकी एकाचा आज पर्दाफाश झाला आहे. अजून दोन अड्डे आहेत. वेट अँड वॉच... थोड्या दिवसांत तेथील बातमी कळेल.’’

ह्यांच्यावर केली कारवाई
सुनील देशमुख, शक्ती देशमुख, गणेश साळुंखे, निवास सूर्यवंशी, मिलिंद साळुंखे (सर्व वांगी, ता. कडेगाव), विश्‍वनाथ रुपनूर, राहुल शिंदे, सतीश जगताप (वडिये रायबाग).

आकड्यात कारवाई

जप्त केलेली वाळू  १५० ब्रास

एक ब्रासची किंमत ९ हजार रुपये

जप्त वाळूची किंमत सुमारे १४ लाख

वाळू तस्करीच्या नोटीस ११ कोटी रुपये

वाळू तस्करीच्या नोटीस ११ कोटी रुपये

आता इशारा, पुन्हा ‘इन्काऊंटर’च

वाळू तस्करीच्या पाठीशी कुणी ना कुणी नक्कीच आहे. त्याचा नकाब फाडल्याशिवाय मी थांबणार नाही. कुणी आड आले तर त्याची नावे जाहीर करेन. महसूल विभागाने वाळू उपशाची ठिकाणी पुढे आणावीत. मी मैदानात उतरलो तर सुटी देणार नाही. ही सरेंडर होण्याची संधी आहे असे समजा. यानंतर कारवाईचा इन्काऊंटरच असेल. हे जमत नसेल तर जिल्हा सोडा, अशा परखड शब्दांत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत गौण खनिज विभागाचा पोस्टमार्टम केला. 

अपर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे गौण खनिज विभागाची मुख्य जबाबदारी आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला चढवत श्री. काळम-पाटील यांनी निर्वाणीचा इशारा दिला. चव्हाण यांच्यापासून गावकामगार तलाठ्यांपर्यंत या विभागातील साऱ्यांना बाजूला ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली. त्याविषयी त्यांनी स्पष्ट शब्दांत ‘माझा या यंत्रणेवर भरवसा राहिलेला नाही’, अशी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली. 

ते म्हणाले, ‘‘इतके दिवस मी सांगतोय; मात्र कारवाईचे नाव काढले जात नाही. तहसीलदारांना म्हणे सशस्त्र पोलिस बंदोबस्त हवा. सुरक्षा हा मुद्दा ठीक आहे; मात्र ती पळवाट करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचा प्रस्ताव मी वाचलाय, त्यावर थिसिस होईल. पुस्तकातील मुद्दे आहेत सगळे. वास्तवात कारवाईचे काय? आजच्या कारवाईला कुठे होता बंदोबस्त? बरं, कुणी नाही म्हटलाय बंदोबस्त. या यंत्रणेला पाठीशी घालणारे महसूलचे लोक असतील तर सोडणार नाही. यांनी कोणताही बुरखा घातला असेल तर तो फाडला जाईल. प्रामाणिकपणे काम करा, जमत नसेल तर जिल्हा सोडा.’’

मीच पोलिसप्रमुख
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘सुरक्षेच्या कारणाने कुणी बाऊ करायचे कारण नाही. तुम्ही मागाल तेव्हा बंदोबस्त मिळेल. मी जिल्हा पोलिस दलाचा प्रमुखच आहे. शिवाय, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अतिशय चांगली भूमिका घेत नेहमीच सहकार्य ठेवले आहे. उलट तेच विचारतात, कारवाईची मोहीम कधी सुरू करायची? अजून काय हवे?’’ 

पाकिस्तानातून येते का वाळू?
जिल्ह्यातील वाळू तस्करीविषयी विचारले की अधिकारी सांगतात, ‘माहितीच नाही.’ ही वाळू काय पाकिस्तानातून येते का? त्याच्या चौकशीला आता रॉ विभागाला बोलवायचे आहे का? काही प्लॅनिंग नाही, कारवाई नाही. आता पुरे झाले. भविष्यात तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा संताप जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

अपर कलेक्‍टरांवर तीव्र शब्दांत नाराजी
जिल्हाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘त्यांना मी पत्र दिले होते, सूचना दिल्या होत्या. सर्व विभागांना सांगितले होते; मात्र कारवाई कुठेच झाली नाही. त्यांनी काही सूचनापत्र दिलेय, तेही मी वाचले. पुस्तकातील मुद्दे चांगले मांडलेत. कारवाईला पळवाटा शोधण्याचा कुणी प्रयत्न करू नये.’’

 

Web Title: sangli news crime on sand spot