मगरींची संख्या वाढलीय? त्या पाणवठ्यावर का येतात?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

सांगलीतील माई घाट आणि आयर्विन पुलाजवळ गेल्या दोन-तीन वर्षांत मगरीचे सातत्याने दर्शन होतेय. उन्हाळ्यात नदीत पोहायला येणाऱ्यांची संख्या वाढते आणि भयभीत झालेल्या जनमानसाची मगरींना पकडा, असा दबाव वाढतो. खरेच मगरींची संख्या वाढलीय? त्या पाणवठ्यावर-लोकवर्दळीच्या नदी पात्रात का येत आहेत? आज माणूस विरुद्ध सर्व निसर्ग-प्राणी अशी स्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने मांडलेले काही मुद्दे....

नद्यांवर हक्क मगरींचाच 
कृष्णेत पूर्वापार मगरी आहेत. जानेवारी ते मे या प्रजनन काळात त्या दक्ष, आक्रमक आणि सावध असतात. या काळातच त्या रहिवासाच्या हद्दी निश्‍चित करतात, जोडीदार निवडतात, अंडी घालण्यासाठी जागा शोधतात, अंड्याचे आणि पिलाचे रक्षण करताना त्या कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेत नाहीत. हे अगदी अनादी काळापासून मानवाच्या जन्माआधीपासून सुरू आहे. मगर नव्हे तर मानवाने त्यांच्या हद्दीत अतिक्रमण केलेय. वीटभट्ट्यांसाठी नदीकाठ ओरबाडला गेला. नदीच्या पोटात घुसून बेफाम-अमर्याद वाळू उपसा झाला. त्यामुळे नदीचे पर्यावरणच धोक्‍यात आले. नदीचे आरोग्य सुधारणांसाठी प्रयत्न आवश्‍यक असताना मगर हटाव असा नारा देणे चुकीचे आहे. ती नदीची अन्नसाखळी अबाधित राखते. मात्र तिला त्रास देणे, मारणे सुरू आहे. माध्यमांनीही याबाबत जबाबदारीने वार्तांकन केले पाहिजे.
- अजित ऊर्फ पापा पाटील
मानद वन्यजीव रक्षक, सांगली जिल्हा

मगरीची लांबी किती?

सांगलीतील मगरीची लांबी १८ फूट असल्याच्या अफवेबाबत पापा पाटील म्हणाले,‘‘आतापर्यंत आपल्या भागात १२.५ ते १३.५ फूट लांबीची मगर आढळली आहे. भिलवडी येथे सुप्रसिद्ध शिकारी जिम कॉर्बेट एकदा शिकारीला आले होते. त्यांना १४ फुटी मगर आढळून आली होती, असे सांगलीतील त्या काळातील प्रसिद्ध शिकारी (कै.) खाडिलकर बंदूकवाले (जुन्या स्टेशन रोडवर त्यांचे गॅरेज होते) सांगायचे. वास्तविक मगर हा प्राणी १४ ते १६ फूट आणि वजन ७०० किलो एवढाच वाढतो. आजपर्यंत भितरकनिका अभयारण्यात फक्त ९० च्या दशकामध्ये १७ फुटी मगर आढळून आली आहे

 मगरीशिवाय नद्या मृतच
सांगलीत मगरींचा पाणवठ्यांवरील वावर हा गेल्या काही वर्षांमध्ये बायपास पुलाच्या तसेच सांगलीवाडीच्या काठालगतच्या वीटभट्ट्या, वाळू उपसा हे कारण आहे. त्यांचा अधिवासच आपण उद्‌ध्वस्त करून टाकला. मगरींची संख्या वाढली हे धादांत खोटे आहे. कृष्णेच्या संपूर्ण पात्रात जिथे त्यांच्यासाठी निवांतपणा होता असा मोठा भाग होता, जो आता तसा निवांत निर्जन राहिलेला नाही. त्यामुळे या मगरी अधिवास सोडून अन्यत्र दिसू लागल्या आहेत. त्यांचे हे जीवनचक्र समजून घेणे आणि त्यानुसार माणसाने आपले वर्तन ठेवणे गरजेचे आहे. जंगलाच्या समतोलासाठी वाघाची जशी गरज आहे, तशीच मगरीची नद्यांच्या पर्यावरण संतुलनासाठी आहे. माणसाला लागणारे विशिष्ट मासे वाढायचे असतील तर त्या माशावर जगणारे दुसऱ्या माशांची संख्या नियंत्रणात हवी. ते नियंत्रण मगरी ठेवतात. मगरीशिवाय नदी मृत आहे.
- हर्षद दिवेकर, वन्यप्राणी अभ्यासक   

  मगरीसोबत सहजीवनच हवे !
नद्याच मगरींचा अधिवास आहे. तेथील अतिक्रमण थांबवून माणसाने मगरीसोबत सहजीवन स्वीकारले पाहिजे. त्यासाठी जनजागृती हवी. यापुढे नद्यांऐवजी माणसाने पाण्यासाठीचे थेट नदीवरील अवलंबित्व कमी केले पाहिजे. नद्यांच्या पर्यावरणात माणसांचा हस्तक्षेप चिंता वाटावा असा आहे. नद्यांमध्ये थेट गटारांचे पाणी सोडले जाते. शेतीसाठी विजेचे पंप बसवले आहेत. ते कमीत कमी मेंटेनन्सचे  सबमर्सिबल पंप बसवले गेले पाहिजेत. मगरीशिवाय नद्या केल्या तर त्याचे भयंकर परिणाम दिसतील. त्यामुळे मानव-मगर सहजीवन हा एकमेव सर्वहिताचा मार्ग आहे. त्यासाठी सुजाण नागरिक आणि सद्‌बुद्धी लाभलेल्या माणसांनी पुढाकार घेतला पाहिजे.
- अमोल जाधव, वन्यजीव अभ्यासक, 
नेचर काँझर्वेशन सोसायटी

  नदी स्वच्छतेकडे दुर्लक्षच
मगरींचे पाणवठ्यावर यायची मला वाटणारी काही कारणे आहेत. ती म्हणजे नदी पात्र दिवसेंदिवस अधिकच अस्वच्छ होत आहे. नदीत मेलेल्या कोंबड्या, मटण दुकानातील टाकाऊ मांस, अनेकदा तर पालिकेचे कचरा कंटेनर समडोळी डेपोऐवजी बायपास पुलावरून नदीत रिते केले जातात. तो कचरा संपूर्ण नदीवर तरंगताना दिसतो. नदीत पडणाऱ्या या घाणीकडे मगर आकर्षित होत असावी. नदीच्या आरोग्याकडे सांगलीकरांनी लक्ष दिले पाहिजे. ती चळवळ झाली पाहिजे. आपल्याला तीन पिढ्या शेरीनाल्याचा प्रश्‍न सुटत नाही हे वास्तव आहे.
- संजय चव्हाण, 
नदी स्वच्छता मोहिमेतील कार्यकर्ते

Web Title: Sangli News crocodile issue