मगरींना मारणाऱ्यांचा वन विभागाकडून शोध सुरू

बाळासाहेब गणे
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

तुंग - दोन महिन्यांतील चार मगरींची क्रूरपणे हत्या झाल्याचे प्रकरण समोर येताच वन विभागाने याचा कसोटीने तपास सुरू करण्याची मागणी प्राणी विभागाकडून होत आहे. बुधवारी कसबे डिग्रज येथे १० फुटांच्या मगरीचे तोडलेले मुंडके सापडले. तसेच यापूर्वी तुंगला मृत मगर सापडली.

तुंग - दोन महिन्यांतील चार मगरींची क्रूरपणे हत्या झाल्याचे प्रकरण समोर येताच वन विभागाने याचा कसोटीने तपास सुरू करण्याची मागणी प्राणी विभागाकडून होत आहे. बुधवारी कसबे डिग्रज येथे १० फुटांच्या मगरीचे तोडलेले मुंडके सापडले. तसेच यापूर्वी तुंगला मृत मगर सापडली. जुनी धामणी येथे ही दोन मगरींची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.

दोन महिन्यांत चार मगरींची हत्या होण्यामागे कोण, याचा शोध सुरू झाला आहे. कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, तुंग, माई घाट,  हरिपूर, ढवळी, धामणी, मिरज घाट येथे मगरींचा वावर जास्त आहे. नदीकाठावर याच भागात जास्त गावे असल्याने मानवी वस्तीचा वावर असतो. वन विभागाने परिसरात पहारेकरी नेमलेत. तरीसुद्धा या भागात मगरींची हत्या व विषबाधा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कायद्यानुसार हत्येप्रकरणी तीन वर्षे विनाजामीन व २५ हजारांचा दंड अशी शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. परंतु ‘कायदा नावाला धाक कुणाला’ असा प्रकार समोर येत आहे.

हरिपूरमधील अडीच फुटांच्या मगरीला भाल्याने  भोसकून मारले. वाळूतस्कर व विटासाठी माती उत्खनन करणाऱ्यांनी त्यांचे अधिवास उद्‌ध्वस्त केले. आता तर मगरीच्या हत्या होत आहेत. हे चिंताजनक आहे.
-पापा पाटील,
प्राणिमित्र

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार मगरीची हत्या करणाऱ्यास अटक, जामीन नाही. तीन वर्षे शिक्षा व २५ हजार दंड अशी तरतूद आहे. अलीकडे मगरींची हत्या व विषबाधा होण्याचे प्रकार वाढले आहे.
- किरण नाईक,
प्राणिमित्र

मगरींच्या हत्येमागे कुणाचा हात असावा शोध सुरू केला आहे. जेथे हत्या व विषबाधा झाली तेथील मासेमारी करणाऱ्यांची चौकशी सुरू केली. दोषी सापडताच कडक कारवाई केली जाईल.
- वन विभागाचे अधिकारी,
सांगली

सातत्याने मगरीच्या होत असलेल्या हत्येमागे  वन विभागाने या नदीकाठावरील मासेमारी करणाऱ्यांना संशयाच्या भोवऱ्यात धरून त्याची माहिती मागवण्यात सुरवात केल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. 

सध्या मासेमारी करणारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत. यात नोंदणीकृत व अनोंदणीकृत अशी वर्गवारी आहे. मासेमारी करताना अनेकवेळा मगरीकडून मच्छीमारावर हल्ले झालेत. जीव धोक्‍यात घालून त्यांना मासेमारी करावी लागते. काहीवेळा जाळ्यातही लहान-मोठ्या मगरी सापडतात. त्यांचे पुढे काय होते? हे कळत नाही. त्यासाठी वनविभागाने भिलवडीपासून हरिपूरपर्यंत असलेल्या मच्छीमारांची यादी केली आहे. अजून नेमकी संख्या स्पष्ट झालेली नाही. 

Web Title: Sangli News crocodile killing issue