‘डॉल्बी’ला करा गोल; वाजवा ऽऽऽ ढोल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

बाजार तेजीत - पथकांचा कसून सराव; गणेशोत्सवात उत्सुकता

सांगली - डॉल्बीरूपी आवाजाच्या राक्षसमुखातून उत्सव मुक्त होत असताना पारंपरिक वाद्यांना चांगले दिवस येताहेत. विशेषतः ढोल पथकांना तरुणाईची पसंती मिळत आहे. गणेशोत्सवात ‘सोडा डॉल्बीचा झोल, चला वाजवा ऽऽ ढोल’ असा आवाज आतापासून घुमतोय. 

बाजार तेजीत - पथकांचा कसून सराव; गणेशोत्सवात उत्सुकता

सांगली - डॉल्बीरूपी आवाजाच्या राक्षसमुखातून उत्सव मुक्त होत असताना पारंपरिक वाद्यांना चांगले दिवस येताहेत. विशेषतः ढोल पथकांना तरुणाईची पसंती मिळत आहे. गणेशोत्सवात ‘सोडा डॉल्बीचा झोल, चला वाजवा ऽऽ ढोल’ असा आवाज आतापासून घुमतोय. 

सांगली, मिरज शहरात चौदा ढोलपथक कार्यरत आहे. सुमारे दीड हजारहून अधिक हौशी व व्यावसायिक वादकांचा समावेश आहे. महिलांचे प्रमाण वाढत आहे. कृष्णाकाठी ‘नाद प्रतिष्ठा’ मंडळाच्या चमूने सांगलीकरांचे लक्ष वेधलेय. काही वर्षे सरावानिमित्त हा चमू येथे  जमतो. पुढे उत्सव काळात महाराष्ट्रभर त्यांचा आवाज घुमतो. नेमीनाथनगरला ‘महामेरू’ या चमूचा सरावही कसून सुरू आहे. असे शहरात ठिकठिकाणी ढोल वादन सरावाचे आवाज आता कानी पडत आहेत. ढोल वादनात विविधता आणताना सोबत झेंडे नाचवण्याचा सराव सुरू आहे. केवळ आवाज नव्हे, तर दृश्‍यात्मकता वाढवून ही परंपरा अधिक आकर्षक व लक्षवेधी करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा पारंपरिक वाद्यसंस्कृती रुजवताना  पकड ढिली पडू द्यायची नाही, याची काळजी पथके घेत आहेत.  

येथे डॉल्बीमुक्त उत्सवाची हाक देताना कायद्याची कडक अंमलबजावणी पोलिसांनी केली आहे. त्याला पर्याय शोधताना दरवर्षी बेंजो आणि बॅंडलाही लोक कंटाळलेत. त्यापेक्षा मस्त ढोलपथक, झांजपथक, लेझीम पथकाला पसंती मिळतेय. या ट्रेंडची छाप आता शाळांतही पडत आहे. तेथे ढोल, झांज, लेझीमसाठी खास प्रशिक्षक बोलावून सराव घेतला जातोय. 
 

सव्वा लाखाची सुपारी...
सांगली, मिरजेत १५ ढोलवादन पथके आहेत. एका कार्यक्रमाला सुमारे ८० हजार ते एक लाख २५ हजारांची सुपारी घेतात. एका पथकात सुमारे ५१ ढोल आणि १३ ताशे असे सरासरी स्वरूप असते. एकेका ग्रुपमध्ये शंभर ते सव्वादोनशे सदस्य आहेत. त्यामुळे एका वेळी दोन-दोन ठिकाणी ढोलवादनाची ऑर्डर घेतली जाते. 

सांगली-मिरजेतील ग्रुप...
महामेरू, नाद प्रतिष्ठा, रणमर्द, तपोवन, होमरुद्र,  शिवतीर्थ, सह्याद्री प्रतिष्ठान, शिव तांडव, रौद्र शंभो (सांगली), विघ्नहर्ता, वेन्नास्वामी, नृसिंह प्रतिष्ठान, समर्थ प्रतिष्ठान (मिरज). सर्वांचे मिळून सुमारे १५०० जणांचा चमू आहे. यात महिलांचे प्रमाणे १० ते १५ टक्के आहे. त्यापैकी वेन्नास्वामी हे मिरजेतील महिलांचे ढोलपथक आहे. 

गणेशोत्सवानिमित्ताने ढोल, ताशाच्या बाजारात उलाढालीला वेग आला आहे. हा शाळांतील उत्सवांचाही हंगाम असल्याने आवाज घुमतोय. डॉल्बी बंदीने या पारंपरिक वाद्यांना आणि पर्यायाने आमच्या पारंपरिक वाद्य व्यवसायाला बरकत येताना दिसतेय. - युनूस सतारमेकर, मिरज

Web Title: sangli news ddolby close in ganeshotsav