आषाढीसाठी डेमू रेल्वे मिरजेत

संतोष भिसे
शुक्रवार, 20 जुलै 2018

मिरज - मिरज-सोलापूर मार्गावर चाचणी अयशस्वी झाल्याने सायडिंगला गेलेली डेमू लोकल रेल्वे पंढरपूर यात्रेच्या निमित्ताने पुन्हा मिरजेत दाखल झाली आहे. आषाढी एकादशीसाठी मिरज ते पंढरपूर मार्गावर धावणाऱ्या जादा गाड्यांमध्ये या डेमूचा समावेश आहे. यात्रा संपेपर्यंत रोज दुपारी २.४० ला ही गाडी सुटेल.

मिरज - मिरज-सोलापूर मार्गावर चाचणी अयशस्वी झाल्याने सायडिंगला गेलेली डेमू लोकल रेल्वे पंढरपूर यात्रेच्या निमित्ताने पुन्हा मिरजेत दाखल झाली आहे. आषाढी एकादशीसाठी मिरज ते पंढरपूर मार्गावर धावणाऱ्या जादा गाड्यांमध्ये या डेमूचा समावेश आहे. यात्रा संपेपर्यंत रोज दुपारी २.४० ला ही गाडी सुटेल.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मिरज-पुणे मार्गावर डेमू (डिझेल मल्टी युनिट) रेल्वेची चाचणी यशस्वी झाली. यामुळे प्रशासनाचा आत्मविश्‍वास वाढला आहे. 

मिरज-पंढरपूर मार्गावर डेमू नियमित सोडली जाण्याची चर्चा असतानाच अचानकपणे बेत रहित झाला.  मिरजेसाठी आलेल्या डेमू गाड्या कुर्डुवाडी स्थानकात सायडिंगला लावण्यात आल्या. नंतर पुण्याला पाठवल्या गेल्या. तेथून सोलापूर, दौंड आदी मार्गांवर सध्या त्या धावत आहेत. 

रेल्वे बोर्डाकडून पुणे विभागाला दहा डब्यांच्या दहा डेमू गाड्या मिळाल्या आहेत. त्यांतील एक मिरजेसाठी प्रास्तावित आहे. मुंबईच्या लोकलसारख्या सुविधा असलेल्या या गाडीची मोठी उत्सुकता प्रवाशांना होती. सोलापूर किंवा पुणे मार्गावर तिला चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा होती. पुणे मार्गावर कोयना एक्‍स्प्रेसनंतर आणखी एक गाडी मिळणार असल्यानेही प्रवाशांत समाधानाचे वातावरण होते; पण डेमू स्थगित झाली. 

सोलापूर मार्गावर चाचणी अयशस्वी झाल्याने हा मार्गही डेमूविनाच राहिला. मिरजेला येऊ पाहणाऱ्या दोन डेमू पुण्यात थांबवण्यात आल्या. मिरजेतील यांत्रिकी, विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना नव्या डेमू गाडीची तांत्रिक माहिती देऊन सज्ज करण्यात आले; प्रतीक्षा होती ती गाडी दाखल होण्याची. ती आता अनपेक्षितरीत्या आषाढी यात्रेच्या निमित्ताने मिरजेत आली आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास पहिली गाडी दाखल झाली. यात्रा संपेपर्यंत ती दररोज धावेल.

डेमू नियमित करावी
रेल्वे प्रवासी सेनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, ‘‘आषाढीच्या निमित्ताने पंढरपूर-मिरज मार्गावर सोडली गेलेली डेमू गाडी नियमित करावी. सध्या या मार्गावर पहाटेच्या कुर्डुवाडी पॅसेंजरनंतर दुपारी चार वाजेपर्यंत गाडी नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. सध्याची डेमू सोलापूरपर्यंत वाढवल्यास तिला प्रवाशांचा खूपच मोठा प्रतिसाद मिळेल.''

Web Title: Sangli News Demu Railway in Miraj