दूध डेअरीआड विषाची फॅक्‍टरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

सांगली -  डोर्ली (ता. तासगाव) येथे दूध डेअरीआड सुरू असलेली विषाची फॅक्‍टरी अन्न-औषध नियंत्रण विभागाने उघडकीस आणली आहे. या ठिकाणी दूध पावडर, रसायने, पामतेल, युरिया, सूर्यफूल तेलाचा वापर करून दररोज पाचशे लिटरहून अधिक बनावट दूध निर्मिती केली जात होती. त्यापैकी ७८४ लिटरहून अधिक बनावट दूध ताब्यात घेतले असून त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील कार्यशाळेला पाठवण्यात आले आहेत.

सांगली -  डोर्ली (ता. तासगाव) येथे दूध डेअरीआड सुरू असलेली विषाची फॅक्‍टरी अन्न-औषध नियंत्रण विभागाने उघडकीस आणली आहे. या ठिकाणी दूध पावडर, रसायने, पामतेल, युरिया, सूर्यफूल तेलाचा वापर करून दररोज पाचशे लिटरहून अधिक बनावट दूध निर्मिती केली जात होती. त्यापैकी ७८४ लिटरहून अधिक बनावट दूध ताब्यात घेतले असून त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील कार्यशाळेला पाठवण्यात आले आहेत. या कारवाईचे पंचनामे आणि अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता सुरू असल्याने त्याची अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र या कारवाईने अन्नात विष कालवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अन्न नियंत्रण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या कारवाईची माहिती दिली. त्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यानुसार, डोर्ली येथे एक दूध व्यावसायिक दररोज सुमारे पाचशे लिटरहून अधिक  दुधाचे संकलन करत होता. ते दूध एका प्रख्यात दूध डेअरीला पाठवले जात होते. गेल्या काही महिन्यांत या दूध संकलन केंद्रातून अचानक दुधाचे उत्पादन वाढले. पाचशे लिटरऐवजी आठशे ते हजार लिटर अशा प्रमाणात दूध पुरवठा बड्या डेअरीला सुरू झाला. त्या पट्टयात म्हशींची संख्या वाढली नव्हती, गाईंची संख्या तेवढीच होती. अन्य दूध संकलन केंद्रांच्या संकलनात कोणताही परिणाम झालेला नव्हता, मग हे संकलन केंद्राचेच  उत्पादन कसे वाढले? अशी शंका संबंधित डेअरी प्रशासनाला आली. त्यामुळे या विषाच्या फॅक्‍टरीवरून पडदा उठू शकला. अन्न-औषध नियंत्रण विभागाला या डेअरीविषयी टीप मिळाली होती. 

संबंधित दूध संकलन केंद्र चालक गावठाणात एका ठिकाणी दूध संकलन करत होता. त्याच्या शेतातील शेडवर बनावट दूध निर्मितीची फॅक्‍टरी आहे. तेथे तो बनावट दुधाची निर्मिती करत होता. गावात संकलित झालेले दूध आणि हे बनावट दूध एकत्र करून ते पुढे डेअरीला पाठवले जात होते. लाखो लिटर दुधात ते हातोहात खपून जात होते. त्यावरून पडदा उठला असून अन्न विभागाकडून लवकरच संबंधिताचे नाव व अन्य तांत्रिक बाबी समोर येतील, असे सांगण्यात आले. आज सायंकाळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील या विभागात बनावट दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची गडबड सुरू होती.

सणाच्या तोंडावर अन्न भेसळीचा धोका
दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर अन्नात भेसळ करणाऱ्या यंत्रणा गतीने कामाला लागतात. अशावेळी अन्न-औषध प्रशासन विभागाने डोळ्यांत तेल घालून दक्ष राहावे, अशा सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. मात्र या विभागातील मोजक्‍या लोकांपैकी काहींना ग्रामपंचायत निवडणुकीची जबाबदारी दिल्याने कारवाई गतिमान होणार का, याविषयी शंका आहेत.

Web Title: sangli news Department of Food Control took action on Milk Dairy