किती माणसं मेली, अक्कल नाही आली...

अजित झळके
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

रस्त्याच्या मधोमध, बाजूला सुरक्षेचे पांढरे पट्टे; गतिरोधकावर पांढरे पट्टे, झाडांवर रिफ्लेक्‍टर, बाजूला पांढरे दगड या सोयी कोणी करायच्या? रस्त्यांचा ठेका देताना टक्केवारीवर जितक्‍या गांभीर्याने आणि हिरिरीने चर्चा होते, तितकी दर्जावर का होत नाही? ऐन दिवाळीत या दहा लोकांच्या कुटुंबांवर जो आघात झालाय, त्याला जबाबदार कोण? ‘किती माणसं मेली, तरी अक्कल नाही आली’

सांगली -  मणेराजुरी (ता. तासगाव) येथील अपघात का झाला, याच्या मुळाशी जाताना हा अपघात नव्हे तर मानवनिर्मित घातपात असल्याचे उघड होते. हा रस्ता कोणत्या विभागाच्या मालकीचा, हे अजिबात महत्त्वाचे नाही. कारण सर्वच विभागांकडील रस्त्यांची मुळे किडून गेली आहेत. रस्त्याच्या मधोमध, बाजूला सुरक्षेचे पांढरे पट्टे; गतिरोधकावर पांढरे पट्टे, झाडांवर रिफ्लेक्‍टर, बाजूला पांढरे दगड या सोयी कोणी करायच्या? रस्त्यांचा ठेका देताना टक्केवारीवर जितक्‍या गांभीर्याने आणि हिरिरीने चर्चा होते, तितकी दर्जावर का होत नाही? ऐन दिवाळीत या दहा लोकांच्या कुटुंबांवर जो आघात झालाय, त्याला जबाबदार कोण? ‘किती माणसं मेली, तरी अक्कल नाही आली’, अशीच स्थिती आहे.

मणेराजुरी-योगेवाडी रस्त्यावर फरशीने भरलेला ट्रक उलटून दहा लोकांचा मृत्यू झाला. धुक्‍यात वळण दिसले नाही, असे कारण समोर आले. धुके होतेच; पण वळण का दिसले नाही? उत्तर सरळ आहे, हा रस्ता इथे वळतो, हे दर्शविणारा ना फलक होता ना पांढरा पट्टा. अर्थातच तो रस्ता म्हणावा या लायकीचाच आहे का, इथंपासून सुरुवात होते. तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. तो राज्य मार्ग आहे. त्यांचा नियम सांगतो, ७ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यावर पट्टे मारा. का? इतर रस्त्यांवरून विमाने धावतात? कोट्यवधीच्या रस्त्यावर पट्टे मारण्याचा असा किती खर्च वाढतो? जिल्हा परिषदेकडील रस्त्यांबद्दल तर बोलायला नको. ‘जो वांछिल तो ते लाहो’प्रमाणे जिथे मागेल तेथे गतिरोधक घालून सर्वांना खूश करणारे बांधकाम विभागातील काही ‘कर्मचारी कम ठेकेदार’ त्यावर पट्टे मारून घेत नाहीत. सांगली-माधवनगर रस्त्यावर वसंतदादा कारखान्यासमोर ज्या दिवशी गतिरोधक केला, त्या दिवशी दोन लोकांचा बळी गेला. 

अपघाती वळण काढून घेऊ, अशी प्रत्येक अपघातानंतर चर्चा होते. कुठे काढले वळण? मणेराजुरी ते योगेवाडी या छोट्या टप्प्यात पाचपेक्षा अधिक वळणं आहेत. कागदावर भरपूर काम झाले आहे. या गोष्टीवर युक्तिवाद करायला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची फौज फायली घेऊन धावेल, वाट्टेल ते करून आम्ही किती भारी आहोत, हे वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांपुढे सिद्धही करतील. त्याने माणसे मरायची थांबणार नाहीत. सांगली-पेठ रस्त्यावरून माजी मंत्री जयंत पाटील कित्येक वर्षे प्रवास करतात. नवे मंत्री सदाभाऊ खोत याच रस्त्यावरून येतात. त्या रस्त्याची अवस्था काय? ठेकेदारांना कारण झालेय, काळ्या मातीत रस्ता टिकत नाही. ठीक आहे, मग घेता कशाला कामे? द्या ना सोडून, बंद पडू दे रस्ता. विमान वाहतूक सुरू करूया... अजून किती काळ दर्जापेक्षा टक्‍क्‍यांना महत्त्व द्यायचे आणि माणसांना मरणाच्या वा टेवर सोडायचे? 

गतिरोधक करता, पट्टे का मारत नाही?
एक उदाहरण म्हणून मिरज ते सलगरे या राज्य मार्गाचा कानोसा घेता व्यवस्थेतील भोंगळपणा पुढे येतो. या राज्य मार्गावर सुरक्षेची एकही भक्कम व्यवस्था नाही. बाजूला दगडावर पांढरा रंग नाही. ओढ्यावरील दगडांनाही रंग फासलेला नाही. असंख्य ठिकाणी गतिरोधक केले आहेत. वळण दाखवले नाही. एकाही ठिकाणी पांढरे पट्टे मारले नाहीत. गतिरोधक फलक नाहीत. गुंजाटे, गुणाणी आणि नलवडे या तीन ठेकेदारांनी हा रस्ता बनवला आहे. आता जबाबदारी कुणाची? सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याचे देणे-घेणे आहे का? 

निवडणूक नौटंकी
तोंडावर निवडणुका आल्या की विरोधकांना मुद्दा लागतो. अलीकडे सर्वपक्षीयांना रस्त्यांचा पुळका आला आहे. ते रस्ते प्रश्‍नावर ‘दिवे’ लावत आहेत. गंमत अशी की, सांगली-पेठ रस्त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा साऱ्या विरोधकांनी दिवे लावले तर मिरजेत भगदाड पडले म्हणून भाजपने... दिव्याखालचा अंधार कुणी शोधायचा? लोक जाणून आहेत, निवडणूक आली की, या नौटंकी होत असतात. मूळ प्रश्‍नाला भिडून त्याचा निपटारा होणार आहे का? 

रोड इंजिनिअरिंगमध्ये रोड साईड ड्रेसिंग हा प्रकारच आपल्याकडे महत्त्वाचा मानला जात नाही. त्याचे नियम पाळले जात नाहीत; किंबहुना त्यावर चर्चाही होत नाही. अपघाताच्या प्रमुख कारणांत त्यांचा समावेश होतो. या सर्व गोष्टींचा तांत्रिक अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून त्यावर कामच झाले पाहिजे. रस्त्याच्या मधे, दोन्ही बाजूला पट्टे हवेतच. मग तो रस्ता छोटा असो किंवा मोठा. रस्ता संपतो कुठे, हे रात्री किंवा पाऊस, धुक्‍यात कळण्यासाठी ते गरजेचे आहे.  
- बाळासाहेब कलशेट्टी,
अध्यक्ष, जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशन

मणेराजुरीतील अपघातातून शहाणपण घेण्याची गरज निर्माण झाली आहे. रस्ता जिल्हा परिषदेचा असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचा, तो छोटा असो वा मोठा, त्यावर पांढरे पट्टे मारलेच पाहिजेत. मी त्यासाठी तत्काळ बैठकीत मंजुरी घेऊन अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करेन.’’
- अरुण राजमाने,

जि. प. बांधकाम सभापती

Web Title: Sangli News Deterioration of roads