‘बायोमेट्रिक’ धान्य खरेदीत सांगली जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

सांगली - राज्यातील स्वस्त धान्य वितरणातील ‘घुशी’ कमी करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘बायोमेट्रिक’ खरेदी पद्धतीने सांगली जिल्ह्याने कमालीची कामगिरी नोंदवली आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यात येथे काम सुरू झाले असले तरी याघडीला जिल्हा पाचव्या स्थानावर पोचला आहे. तब्बल ८३ टक्के धान्यवितरण ‘अंगठा’ दाखवून होत आहे.

सांगली - राज्यातील स्वस्त धान्य वितरणातील ‘घुशी’ कमी करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘बायोमेट्रिक’ खरेदी पद्धतीने सांगली जिल्ह्याने कमालीची कामगिरी नोंदवली आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यात येथे काम सुरू झाले असले तरी याघडीला जिल्हा पाचव्या स्थानावर पोचला आहे. तब्बल ८३ टक्के धान्यवितरण ‘अंगठा’ दाखवून होत आहे. येत्या दोनएक महिन्यात ते शंभर टक्‍क्‍यांवर पोचलेले असेल, असा विश्‍वास जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

कवठेमहांकाळ तालुक्‍यात ९०, सांगली शहरात २२०, तासगावमध्ये ९७, आटपाडीत ८९, कडेगावमध्ये ८२, पलूसमध्ये ५६, शिराळ्यात ११५, मिरजमध्ये १३४, खानापूरला ११२, वाळव्यात १८१ आणि जतमध्ये १७५ दुकानांत पॉश मशीन बसवण्याचे उद्दिष्ट होते. पैकी तासगाव तालुक्‍यात १ आणि खानापूरला २ ठिकाणी मशीन बसवणे बाकी आहे. १३५१ पैकी १३५८ ठिकाणी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. यावर सरासरी ४८ टक्के आधार कार्ड जोडण्यात आले आहेत. आजवरचे एकूण सरासरी वितरणाची टक्केवारी ५६.८६ इतकी आहे.

राज्यात केवळ चंद्रपूर, कोल्हापूर, भंडारा आणि यवतमाळ हे चार जिल्हे सांगलीच्या पुढे आहेत. दरम्यान, द्वारपोच धान्य योजनेसाठाची रखडलेला ठेका दोन दिवसांत निघेल, असे श्री. गायकवाड यांनी स्पष्ट केले.  राज्यात स्वस्त धान्य वितरणातील घोटाळा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

जिल्ह्याच्या गोदामातून निघालेला माल ग्राहकांच्या पिशवीत पोचतो की त्याचा मधेच ‘बाजार’ होतो, याविषयी अनेकदा शंका घेतल्या गेल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे ग्राहकांचा हिशेबच शक्‍य नव्हता. खोट्या पावत्यांची तपासणी शक्‍य नव्हती. परिणामी ही यंत्रणा काळ्या बाजारावर पोसवली होती. या ‘घुशी’ स्वस्त धान्य दुकानापासून ते पुरवठा विभागापर्यंत लागलेल्या होत्या. त्याला एका झटक्‍यात मोठा ब्रेक लागल्याचे चित्र आता समोर यायला लागले आहे. अर्थात त्यात अजून बऱ्याच सुधारणांना वाव आहे. त्यामुळे काहीअंशी या यंत्रणेची अस्वस्थताही लपलेली नाही.

बायोमेट्रिक केलेले तालुकावार ग्राहक
कवठेमहांकाळ ः १५ हजार ४४६,  सांगली शहर ः ३५ हजार ९०४,  तासगाव ः २३ हजार ४९, आटपाडी ः १३ हजार ९१, कडेगाव ः १४ हजार ३५१, पलूस ः १६ हजार ४४०, शिराळा ः १५ हजार ३७१, मिरज ः २६ हजार ९६०, खानापूर ः १३ हजार ९८१, वाळवा ः ३१ हजार ५८६, जत ः १९ हजार ५१३.

Web Title: Sangli news district in Fifth place in Bio metric grain purchase