सांगली ‘स्थायी’त गदारोळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

सांगली - महापालिका क्षेत्रातील महिलांसाठी ३२ ठिकाणी ४२ स्वच्छतागृहे युनिट बसवण्याच्या  मुद्द्यावरून स्थायी समितीच्या बैठकीत आज उपमहापौर-स्वाभिमानी गटातील सदस्यांनी गदारोळ केला. सभापतींनी विनानिविदांचा हा घाट का घातला, असा  अाक्षेप घेत विरोधी झेंडा फडकवत आक्रमक भूमिका घेतली. अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी एकत्रितपणे बहुमतांनी विषयाला मंजुरी दिली. सभापती संगीता हारगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. 

सांगली - महापालिका क्षेत्रातील महिलांसाठी ३२ ठिकाणी ४२ स्वच्छतागृहे युनिट बसवण्याच्या  मुद्द्यावरून स्थायी समितीच्या बैठकीत आज उपमहापौर-स्वाभिमानी गटातील सदस्यांनी गदारोळ केला. सभापतींनी विनानिविदांचा हा घाट का घातला, असा  अाक्षेप घेत विरोधी झेंडा फडकवत आक्रमक भूमिका घेतली. अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी एकत्रितपणे बहुमतांनी विषयाला मंजुरी दिली. सभापती संगीता हारगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. 

प्रारंभीच अजेंड्यावरील स्वच्छतागृहांचा विषय घेण्यात आला. महिलांसाठी गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ व सुविधायुक्त स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहे, असे सभापतींनी सांगितले. त्यात स्टीलचा वापर असलेली या सोलर पंखे व दिवे स्वच्छतागृहात असतील. पाण्याची सुविधा असेल. एक युनिट असलेली २१, तर दोन युनिट असलेली १० स्वच्छतागृहे असतील. सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्कच्या वतीने ही स्वच्छतागृहे बनवली आहे. त्यासाठी ९८ लाख ५६ हजारांचा खर्च येणार आहे. तो विनानिविदा डाव असल्याने समजल्याने उपमहापौर-स्वभिमानी गटातील सदस्य मनगू सरगर, शिवराज बोळाज, सुनीता पाटील, प्रदीप पाटील, निर्मला जगदाळे यांनी एकत्रितपणे विरोध केला. सभापतींनी ऐनवेळचे आणि विनानिविदांचे विषय घेणार नाही, अशी भूमिका का बदलली, असा जाब विचारण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी, काँग्रेस सदस्यांनी चकार शब्द काढला नाही. अखेर मतदानाद्वारे बहुमताच्या जोरावर विषयाला मंजुरी दिली. 

प्रियंका बंडगर यांनी वॉन्लेसवाडीतील १२ मीटर नाल्यावर बांधकाम सुरू असून ते बांधकाम तातडीने थांबवावे, अशी मागणी केली होती. त्याचा अहवाल अजूनही सादर झाला नसल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांचीही उपस्थिती नव्हती. उपायुक्तांनी अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 

पावसाळ्याच्या तोंडावर पॅचवर्कचे काम केले जाणार आहे. त्यासाठी व्हिजिटबुक ठेवावे, अशा सूचना सदस्यांनी मांडल्या. तसा आदेशही सभापतींनी प्रशासनाला दिला. शिवराज बोळाज यांनी स्टॅंड ते शिवाजी मंडईपर्यंतच्या रस्त्याचा विषय अजूनही स्थायीत आला नसल्याने डायससमोर ठिय्या मारला. रस्त्याचे काम तातडीने न झाल्यास आंदोलन करू, असा इशाराही दिला. अखेर सभापतींनी प्रशासनाला सूचना  करीत सभा गुंडाळली.

सभापती कुणाचं ‘हित’ जपतात?
सभापती निवडीवेळी ऐनवेळचे आणि विनानिविदांचे विषय घेतले जाणार नाही, याच मुद्द्यावर उपमहापौर-स्वाभिमानी गटातील सदस्यांनी सौ. हारगे यांना मतदान केले. निवडीनंतर काहीच महिन्यांत सभापतींनी ऐनवेळचे आणि विनानिविदांचे विषय घेण्यास सुरुवात केली. महिलांच्या आरोग्याची आताच चिंता त्यांना वाटू लागली आहे. सभापतींची ही भूमिका कुणाचं हित जपण्यासाठी आहे, असा सवाल विरोधी सदस्यांनी केला. पालिका वर्तुळातही याची जोरदार चर्चा होती.

सदस्यांची तक्रार 
विनानिविदांच्या कामाला विरोध करणाऱ्या पाच सदस्यांनी बैठकीनंतर तत्काळ आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याकडे  लेखी तक्रार केली. त्याची प्रत विभागीय आयुक्तांकडेही दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विनानिविदांमुळे ठेकेदारांत स्पर्धा होणार नाही. निविदातून स्पर्धा झाली, तर दरही कमी होऊन पालिकेस  फायदा होऊ शकतो. परंतु ‘स्थायी’तील सदस्यांनी विनानिविदांचा घाट घातला आहे. पालिकेचे हित पाहता हा ठराव विखंडित व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: sangli news disturbance in standing committee meeeting