सांगलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा बालकांना चावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

सांगली -  त्रिमूर्ती कॉलनीत शनिवारी (ता. ७) सायंकाळी पिसाळलेल्या भटक्‍या कुत्र्याने धुमाकूळ घातला. या कुत्र्याने तीन बालकांवर हल्ला करून त्यांना चावा घेतला. त्यात ही बालके जखमी झाली आहेत. त्यांना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतप्त नागरिकांनी कुत्र्याला आज सकाळी मारले. मात्र, तत्पूर्वी या कुत्र्याने आणखी तीन कुत्र्यांना चावा घेतला आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर डॉग व्हॅन पथकाने या कुत्र्यांना पकडून नेले.

शंभर फुटी रस्त्यावर डी मार्टमागे असलेल्या त्रिमूर्ती कॉलनीत काल सायंकाळी एक भटके कुत्रे पिसाळले. त्याने परिसरात धुमाकूळ घातला. कॉलनीतील स्वामी समर्थ केंद्रासमोर शुभम सिद्धराम बिराजदार (वय ४), आरोही बाबासाहेब सांगोलकर (३), विराज सुनील रेड्डी (६) ही तीन बालके खेळत होती. कुत्र्याने या तिघांवर हल्ला केला. एकाच्या पाठीजवळ गंभीर चावा घेतला. एकाच्या मानेजवळ आणि एकाच्या गळ्याजवळ चावा घेतला.

हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी या कुत्र्याला दगडांनी मारले. यात कुत्रे अर्धमेले झाले; तर मुलांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. काल रात्री बराच वेळ पाऊस सुरू होता. आज सकाळी पिसाळलेले कुत्रे पुन्हा शुद्धीवर आले. त्याने परिसरात तीन कुत्र्यांना चावा घेतला. हे लक्षात आल्यावर नागरिकांनी पुन्हा त्याला मारले. ते ठार झाले.
कुत्रे पिसाळले आहे. त्याने परिसरात दहशत माजविल्याची माहिती नागरिकांनी महापालिकेच्या डॉग व्हॅन पथकाला दिली. पथकाचे प्रमुख सिद्धार्थ कांबळे व सहकाऱ्यांनी त्रिमूर्ती कॉलनीत धाव घेतली. चावा घेतलेल्या तीन कुत्र्यांना पकडले.

भटक्‍या कुत्र्यांचा त्रास वाढला
मिरजेत काही दिवसांपूर्वी भटक्‍या कुत्र्यांनी बालकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्या पाठोपाठ सांगली शहरातही भटक्‍या कुत्र्याच्या हल्ल्याचे प्रकार समोर आले. त्यात तीन बालके जखमी झाली आहेत. भटक्‍या कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिका मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही होते की नाही, हे अंधारातच आहे. भटक्‍या कुत्र्यांवर कारवाईचा प्रश्‍न भिजत घोंगडे बनला आहे. त्यांच्या दहशतीमुळे बालकांचे जीव धोक्‍यात आहेत. मात्र, महापालिकेला ही कुत्री पकडण्यात फारसा रस नाही. त्यामुळे मिरज आणि सांगलीत अशा कुत्र्यांनी बालकांवर हल्ला करेपर्यंत त्यांच्याकडे डोळेझाक केली जात आहे.

Web Title: sangli news dog bites child