सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण - जावडेकर

धर्मवीर पाटील
रविवार, 11 मार्च 2018

इस्लामपूर - सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे, आणि ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन लेखक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी आज येथे केले. प्रेम आणि खदखद व्यक्त करण्याचा युवा पिढीला मिळायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

इस्लामपूर - सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे, आणि ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन लेखक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी आज येथे केले. प्रेम आणि खदखद व्यक्त करण्याचा युवा पिढीला मिळायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इस्लामपूर आणि राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीतर्फे आयोजित युवा नाट्य साहित्य संमेलनात ते बोलत होते. धैर्यशील पाटील, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी, राजन लाखे, तानसेन जगताप, प्रा. शामराव पाटील, प्रा. दशरथ पाटील, शशिकला पवार, रावसाहेब पवार, कल्याण शिंदे, सोपान चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रातील प्रा. संदीप पाटील, इरफान मुजावर, राजवर्धन यादव, मनीषा पाटील, श्रीकांत माने, रमजान मुल्ला यांचे विशेष सत्कार झाले.

डॉ. जावडेकर म्हणाले, "फेसबुक पोस्ट हा साहित्याचा नवा प्रकार आहे. इथे लोकशाही आहे; परंतु इथले मार्केटिंग धोकादायक आहे. मराठीत अन्य भाषेतील येणाऱ्या शब्दांची भीती अवाजवी आहे. प्रमाणभाषा नकोच ही भूमिका चुकीची आहे. कोणतेही साहित्य हे मूलतः सामाजिक आणि राजकीयच असते. सत्तेला तोंड देताना साहित्यिकांना काही दरडावून सांगता येत नसेल तर नक्कीच दोन्हीत काहीतरी अंतर आहे, हे समजून घ्यावे लागेल. संमेलनाची गरज आहे. त्यातून वाचक घडतो. अनेकांना व्यासपीठ मिळते."

खरा वाचकवर्ग ग्रामीण आणि निमशहरी भागात आहे. शहरांमध्ये भाषेचा फारसा अभिमान राहिलाय अशी स्थिती नाही. नवी पिढी धाडसी आहे. नव्या दमाचे लेखक काही वेगळे आणि ताकदीचे लेखन घेऊन येताहेत. नवी पिढी वाचत नाही, हा गैरसमज आहे. विनोदी साहित्य कमी होतेय. ते लिहिणे आणि वाचणे अवघड आहे.

- डॉ. आशुतोष जावडेकर

विनोद कुलकर्णी म्हणाले, "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मसापचे प्रयत्न यशाच्या वाटेवर आहेत."

विभागीय व समीक्षा संमेलने ग्रामीण भागात घेत आहोत. बालकुमार आणि युवकांच्यावर साहित्य, संस्कृती आणि वाचन चळवळ टिकविण्याची जबाबदारी आहे. तरुणपिढीचे भावनिक भरणपोषण करण्यासाठी संमेलने आवश्यक आहेत.

- मिलिंद जोशी

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ग्रंथदिंडी निघाली. सुरवातीला अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सॉक्रेटिस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम हे पथनाट्य सादर केले. सोमनाथ सुतार व सहकाऱ्यांनी नांदी सादर केली. प्रा. प्रदिप पाटील यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. दीपा देशपांडे, दीपक स्वामी, डी आर सलगर, सर्जेराव कचरे, सुभाष खोत, वृषाली आफळे, बसवेश्वर स्वामी, मंगल कोकाटे यांनी संयोजन केले. 

साहित्यक्षेत्रात सकारात्मक दबावगट हवेत
ग्रामीण भागातील चांगल्या दर्जाचे साहित्यिक पुढे यावेत यासाठी साहित्यक्षेत्रात सकारात्मक दबावगट निर्माण झाले पाहिजेत, अशी अपेक्षा मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली.

Web Title: Sangli News Dr. Ahutosh Javdekar comment