गद्दार फडणवीस सरकारची उचलबांगडी करू - नवले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

कर्जमाफीसाठी आता आरपार लढा

कर्जमाफीसाठी आता आरपार लढा
सांगली - सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने एकदा नव्हे तर दोनदा शेतकऱ्यांशी गद्दारी केली आहे. कर्जमाफीचे लबाडाघरचे अवतान बस्स झाले. आता फडणवीस सरकारने "सरसकट'चा शब्द पाळावा. शेतकऱ्याची पोरं आता उल्लू बनणार नाहीत, ती सरकारची उचलबांगडी करतील, असा इशारा किसान सभेचे प्रदेश सचिव व सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले यांनी शनिवारी येथे दिला.

मराठा सेवा संघात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सरसकट कर्जमाफीसाठी सुकाणू समिती रविवारच्या (ता. 23) मेळाव्यात पुण्यात आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करेल. आरपारच्या लढ्याला तयार राहा, असे आवाहन त्यांनी केले. किसान सभेचे केंद्रीय सहसचिव अशोक ढवळे, सत्यशोधक सभेचे नेते किशोर ढमाले, समिती सदस्या सुशीला मोराळे, किसन गुजर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते विचारमंचावर होते. खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील यांच्या अनुपस्थितीत मेळावा झाला.

नवले म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी "ऐतिहासिक' अशी वल्गना केलेली कर्जमाफी सरसकट फसवी आहे. "सरसकट'चा अर्थ थकबाकीदार, चालू, पतसंस्था कर्जदार, बचत गट कर्जदार, सावकारी कर्जदार, शेतीपूरक कर्जदार असा अभिप्रेत आहे. एक लाख 14 हजार कोटींचे पीककर्ज असताना 34 हजार कोटींची कर्जमाफी झाली. 80 हजार कोटींचे कर्ज शेतकऱ्यांच्या खांद्यावर कायम राहिले. मग मिळाले काय? देवेंद्रभाऊ सुधारा, अभ्यास बस्स झाला. शेतकऱ्यांची पोरं तुम्हाला चौकाचौकांत गाठतील. ही त्यांची हक्काची लढाई आहे, तुम्ही कर्जमाफी देऊन उपकार करत नाहीत.''

झेंडा सोडा, बाप बघा
अजित नवले यांनी सदाभाऊंचे नाव न घेता एकजुटीचे आवाहन केले. ते म्हणाले, 'कोण मोठा, कोण आगे बढो, कुणाचा झेंडा कसला, यापेक्षा शेतकऱ्यांच्या पोरांनी आपला बाप मरतोय, हे पाहावं. आपली एकजूट ही यशाची पूर्वअट आहे. आपण फुटावं, यासाठी ते वाट्टेल ते करतील. ही आरपारची लढाई आहे. कुणासाठी थांबणार नाही.''

Web Title: sangli news dr. ajit navale talking about fadnavis government