बंदिस्त शाळा मोकळ्या करा - डॉ. अनिल अवचट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 डिसेंबर 2017

मिरज - चार भिंतीच्या आतील शाळा ही संकल्पना विद्यार्थी घडवूच शकत नाही. विद्यार्थी जेवढा खुल्या वातावरणात चांगल्या पद्धतीने आणि नैसर्गिकरीत्या घडतो तेवढा कोठेच घडू शकत नाही, असे मत ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांनी व्यक्त केले.

मिरज - चार भिंतीच्या आतील शाळा ही संकल्पना विद्यार्थी घडवूच शकत नाही. विद्यार्थी जेवढा खुल्या वातावरणात चांगल्या पद्धतीने आणि नैसर्गिकरीत्या घडतो तेवढा कोठेच घडू शकत नाही, असे मत ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांनी व्यक्त केले.

चैतन्य एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी अध्यक्षस्थानी होते. 

अवचट म्हणाले, ‘‘आपल्या देशाची खरी ओळख ही अतिशय साध्या राहणीची आणि सोप्या विचारांची आहे. त्यामुळे अवघड, किचकट अभ्यासक्रमांऐवजी सोप्या पद्धतीचे; पण उच्च विचारांचे विज्ञान विद्यार्थ्यांना शिकवणे मला व्यवहार्य वाटते. मराठी लेखनात हिमालयाएवढी  उंची असणारे लेखक इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना  कसे उमगणार? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

कुसुमाग्रज, ग्रेस, पु. ल. देशपांडे आणि समकालीन मराठीतील चांगल्या लेखकांच्या पुस्तकांपासून ही पिढी पूर्ण वंचित राहिली असून आपल्या स्वत:च्या मातीतला कोणता विचार ते पुढील पिढीला देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.’’

ते म्हणाले, ‘‘मराठीची उपेक्षा आता थांबायला हवी. ज्या शाळांमध्ये नापास मुलांची कदर केली जाते. त्यांचा मान-सन्मान केला जातो. त्याच शाळा खऱ्या अर्थाने शिक्षणपद्धती राबवितात, असे माझे मत आहे. गुणवत्ता ही केवळ गुणांच्या संख्येवर मोजता येत नाही. अनेक उच्चशिक्षित मुलेही ऐन तारुण्यात आत्महत्या करतात आणि नापास म्हणून जगायला नालायक ठरवलेली मुले कर्तबगार बनतात हे कशाचे लक्षण आहे ? याचाही विचार शैक्षणिक संस्था चालवणाऱ्यांनी करायला हवा. गेल्या काही वर्षांतील  इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे वाढते प्रमाण हे या  व्यवस्थेचे अपयश आहे. अर्थात याचाही फुगा येत्या काही वर्षांत फुटेल, असाही आत्मविश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. जी मुले फक्‍त इंग्रजी माध्यमात शिकतात ती आपल्याच मातृभाषेतील सुंदर साहित्यापासून वंचित राहतात. 

अध्यक्षस्थानावरून बोलताना ‘दैनिक सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी म्हणाले, ‘‘न्यू इंग्लिश  स्कूल हे सांगली जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राचे मोठे संचित आहे. ज्या शाळेतून सुमारे दोनशे डॉक्‍टर्स, अनेक वकील, न्यायाधीश, सैन्यातील अधिकारी तयार झाले त्यामुळे या शाळेचे योगदान देशासाठी मोठे आहे. शाळा ही संकल्पना किती व्यापक आणि सेवाभावी असू शकते हेच न्यू इंग्लिश स्कूलच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी स्पष्ट केल्याचेही ते म्हणाले.’’ व्यासपीठावर पोलिस उपाधीक्षक धीरज पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मकरंद  देशपांडे उपस्थित होते. यावेळी श्री. अवचट यांचे  स्वागत डॉ. विकास पाटील यांनी केले. डॉ. संजय व्हावळ यांनी प्रास्ताविक केले. 

Web Title: Sangli News Dr. Anil Avchat comment