विकासाच्या पंढरीचा निष्ठावंत वारकरी होईन - डॉ. विश्‍वजित कदम

संतोष कणसे
सोमवार, 26 मार्च 2018

कडेगाव - मी पतंगराव कदम होऊ शकत नाही. मात्र, त्यांनी पलूस - कडेगावच्या विकासाला आयुष्याची पंढरी मानली. त्या पंढरीचा मी निष्ठावंत वारकरी नक्की होईन. कोणी पोरकं समजू नये. साहेबांनी सेवा केली, त्याच पद्धतीने मी, कदम कुटुंबीय मतदारसंघातील सामान्य व शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत, असे भावनिक आवाहन डॉ. विश्‍वजित कदम यांनी येथे सर्वपक्षीय शोकसभेत केले.

कडेगाव - मी पतंगराव कदम होऊ शकत नाही. मात्र, त्यांनी पलूस - कडेगावच्या विकासाला आयुष्याची पंढरी मानली. त्या पंढरीचा मी निष्ठावंत वारकरी नक्की होईन. कोणी पोरकं समजू नये. साहेबांनी सेवा केली, त्याच पद्धतीने मी, कदम कुटुंबीय मतदारसंघातील सामान्य व शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत, असे भावनिक आवाहन डॉ. विश्‍वजित कदम यांनी येथे सर्वपक्षीय शोकसभेत केले. यावेळी मान्यवरांनी दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहिली. 

श्री. कदम म्हणाले, ‘‘जनतेने आशीर्वाद दिले, तेच साहेबांची शक्ती होती. त्यांनी जे केले त्याचा आनंद, अभिमान आयुष्यभर राहील. साहेबांना संघर्षात निष्ठावंत माणसे भेटली. ती त्यांच्यानंतर मलाही भेटली. अनेकांनी आठवणी सांगितल्या. लहान होतो तेव्हाही साहेबांचा जास्त सहवास लाभला नाही. कामानिमित्त ते नेहमी बाहेर असत. आता मोठे झाल्यानंतर हे समजतंय. गरिबाला आपल्यासारखे चटके बसू नयेत, म्हणून ते कार्यरत राहिले. ताकारी, टेंभू, म्हैसाळच्या माध्यमातून दुष्काळी भागाचे नंदनवन केले.’’

भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, ‘‘साहेबांचा व माझा राजकीय संघर्ष झाला. परंतु, तालुक्‍याच्या विकासाबाबत एकवाक्‍यता होती. विकासाच्या संदर्भातील साहेबांची भूमिका सुरूच ठेऊ. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर घेऊन वाटचाल करावी. साहेबांनी रस्ता दाखवला, त्यावरून कदम कुटुंबीय व आम्हीही जाऊ.’’

ज्येष्ठ नेते लालासाहेब यादव म्हणाले, ‘‘साहेब स्पष्टवक्ते होते. हजारोंना नोकऱ्या दिल्या. विविध खात्यांत ठसा उमटवला.’’
श्रमिक मुक्ती दलाचे नेते मोहनराव यादव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मोहिते, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भीमराव मोहिते, नगराध्यक्षा आकांक्षा जाधव, भरत महाडिक, मालन मोहिते, सत्यजित यादव, सुनील पाटील, बाबासाहेब परीट, विजय शिंदे, डॉ. अभिजित रेणुशे, सहाना शेख, शेखर कुलकर्णी, सूरज पवार, आनंदराव मोरे, लक्ष्मण डांगे, पी. सी. जाधव, निवृत्त कार्यकारी अभियंता तानाजी जेंगटे, चेतन सावंत, खुदबुद्दीन शेख यांनीही आठवणी जागवल्या.

आमदार मोहनराव कदम, शांताराम कदम, जितेश कदम, राजाराम गरूड, गुलाम पाटील, सुरेश निर्मळ, दीपक भोसले, इंद्रजित साळुंखे, शरद कदम, उपनगराध्यक्ष साजीद पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पृथ्वीराज कदम, महेंद्र लाड, डी. एस. देशमुख, सुनील मोहिते आदींसह तालुक्‍यातील नागरिक, महिला उपस्थित होते.
 

Web Title: Sangli News Dr Vishwajeet Kadam comment