त्रिशूल घाटावरून गटारीचे पाणी थेट कृष्णा नदीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

सांगली - सांगलीवाडीतील त्रिशूल घाटावरून गटारीचे पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे. नागरिकांचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार काय, असा सवाल इथल्या नागरिकांनी केला आहे. 

सांगली - सांगलीवाडीतील त्रिशूल घाटावरून गटारीचे पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे. नागरिकांचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार काय, असा सवाल इथल्या नागरिकांनी केला आहे. 

सांगलीवाडी महापालिका क्षेत्रात असूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. समस्यांनी ग्रासलेल्या सांगलीवाडीत दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. गेल्या महिन्यात दूषित पाण्यामुळेच गॅस्ट्रोची साथ या परिसरात आली. घरटी एक रुग्ण अशी गत निर्माण झाली होती. इतके होऊनही ढिम्म प्रशासनाला जाग येत नाही. आता तर थेट गटारीचे पाणी कृष्णा नदीत मिसळत आहे. ते पाणी नागरिकांना पिण्यासाठी दिले जाते.

सांगलीवाडीतील गटारीचे पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने ही वेळ आली आहे. दोन दिवसांत हा प्रश्‍न सोडविला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल.
- हरिदास पाटील, 

माजी नगरसेवक 
 

सांगलीवाडीतील मंगेश्‍वर चौक, बाळूमामा मंदिर परिसरात चार दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्यामुळे अनेक साथीच्या रोगांना आयते आमंत्रण दिले जात आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. परिसरात मिरविणाऱ्या नेत्यांनाही नागरिकांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आता नागरिकांचा जीव गेल्यावरच ही मंडळी जागी होणार का, असा सवाल उपस्थित होतोय. 

चेंबर तुंबल्याने प्रकार 
सांगलीवाडीचे सांडपाणी ड्रेनेज पंपावर साठविले जाते. मोटारीच्या सहाय्याने हनुमानगरमधील ॲक्‍सीडेशन प्लॅंटवर नेले जाते. दोन दिवसांपासून सारे चेंबरच तुंबले आहेत. त्यामुळे ओव्हरफ्लो झालेले पाणी आता थेट नदीत मिसळत असून, पालिकेचे ढिम्म प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिसरातील कारभारीही याबाबत आवाज उठवताना दिसत नाहीत.

Web Title: Sangli News Drainage water directly from Trishul Ghat in Krishna river