मैलामिश्रित सांडपाणी थेट कृष्णा नदीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

थेट मैलामिश्रित सांडपाणी नदीत मिसळत आहे. त्यामुळे सांगली पुढील हरिपूर, अंकली, मिरज आदी गावांमध्ये रोगराईचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

सांगली - गेल्या चार-पाच वर्षांपासून ड्रेनेज योजनेच्या कामासाठी हनुमाननगरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्णतः बंद आहे. त्यामुळे दररोज कोट्यवधी  लिटर सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. थेट मैलामिश्रित सांडपाणी नदीत मिसळत आहे. त्यामुळे सांगली पुढील हरिपूर, अंकली, मिरज आदी गावांमध्ये रोगराईचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

महापालिकेने ३० मार्चपूर्वी कृष्णा नदीत सोडले जाणारे थेट सांडपाणी बंद करण्याची लेखी हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली होती आता ती मुदतही संपली आहे. 

आकडे बोलतात...

  •  सांगली व कुपवाड शहरातील नळ जोडण्या-५२ हजार 
  •  सांगली लोकसंख्या - २ लाख ६१ हजार १०७
  •  कुपवाड लोकसंख्या- १ लाख २५ हजार ९३२
  •  माणसी दैनंदिन पाणी वापर - १३५ लिटर 
  •  सांगलीसाठी दैनंदिन पाणी उपसा- ७ कोटी २० लाख लिटर
  •  नदीत दररोज मिसळणारे सांडपाणी- ५ कोटी ६० लाख लिटर

गेली पाच वर्षे महापालिकेच्या ड्रेनेज योजनेचे भिजत घोंगडे पडले आहे. शंभर कोटींचा खर्च झाला आहे. ज्या हनुमाननगर एसटीपी प्रकल्पाचे बांधकामाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे मात्र पाणी शुद्धीकरणाची तांत्रिक कामे, यंत्रणा व वीज पुरवठा अशी कामे अद्याप बाकी आहेत. गेली तीन महिने कोणत्याही क्षणी एसटीपी सुरू केला जाऊ शकतो, असा दावा ड्रेनेज विभागाकडून केला जातो. प्रत्यक्षात मात्र त्याबद्दल कोणतीही खात्री देता येत नाही अशी स्थिती आहे.

मैलामिश्रित सांडपाणी पिण्याइतपत शुद्ध करणे आव्हान आहे. त्यामुळे कावीळ, कॉलरा, टायफाईड, गॅस्ट्रो अशा साथीची शक्‍यता आहे. ड्रेनेजमध्ये उंदराची मोठी संख्या असते. त्यांची विष्टा मानवी संपर्कात आल्यास लेप्टोसारखा घातक रोगाची शक्‍यता असते. शुद्ध पाणी  हा मानवाधिकार झाला पाहिजे. असे पाणी देणे स्थानिक स्वराज्य संस्थांसह शासनाचे पहिले कर्तव्य असले पाहिजे.
डॉ. राजेंद्र भागवत

‘एसटीपी’च बंद असल्याने सध्या शेरीनाला, हरिपूर रस्ता नाला, विष्णू घाट आणि सांगलीवाडी येथील सर्व सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. गेली पाच वर्षे हा प्रकार सुरू असून त्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त नोटिशींचा खेळ करीत आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये महापालिकेला अंतरिम नोटीस दिल्यानंतर ३० मार्चपूर्वी सांडपाणी सोडणे बंद करू, अशी हमी पालिकेने दिली होती. आता ती मुदतही संपली आहे.

Web Title: Sangli News drainage water mixing in Krishna River