मिरजेत कचराकुंडीत लाखोंच्या औषध-गोळ्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

मिरज - कालबाह्य झालेल्या आणि कालबाह्य नसलेल्या औषधाच्या गोळ्यांचा मोठा साठा आज येथील एमआयडीसी रस्त्यावरील महापालिकेच्या कचराकुंडीत आज सापडला. छोटे मालवाहू वाहन भरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात हा साठा खराब करून महापालिकेच्या कचराकुंडीत टाकण्यात आला. एकूण दोन प्रकारच्या या औषधी गोळ्या असून यापैकी एक गोळी ही रक्तवाढीसाठी तर दुसरी गोळी ही मूत्राशयातील विकारांवरील आहे.

मिरज - कालबाह्य झालेल्या आणि कालबाह्य नसलेल्या औषधाच्या गोळ्यांचा मोठा साठा आज येथील एमआयडीसी रस्त्यावरील महापालिकेच्या कचराकुंडीत आज सापडला. छोटे मालवाहू वाहन भरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात हा साठा खराब करून महापालिकेच्या कचराकुंडीत टाकण्यात आला. एकूण दोन प्रकारच्या या औषधी गोळ्या असून यापैकी एक गोळी ही रक्तवाढीसाठी तर दुसरी गोळी ही मूत्राशयातील विकारांवरील आहे. या दोन्ही गोळ्यांच्या आवरणावरील किंमत ही दहा गोळ्यासांठी ७९ रुपये एवढी आहे. या प्रकाराची शासनाच्या औषध विभागाने गंभीर दखल घेतली आहे. 

मिरजेहून एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खतीबनगरच्या कोपऱ्यावर महापालिकेने कचऱ्याचा कंटेनर ठेवला आहे. या कंटेनरमध्ये या गोळ्यांचा साठा बेवारस पद्धतीने टाकण्यात आला आहे. यापैकी रक्तवाढीच्या गोळ्यांचे उत्पादन ऑक्‍टोबर २०१६ मधील आहे आणि या गोळ्यांची अंतिम मुदत ही मार्च २०१८ ही आहे. या गोळ्यांची निर्मिती ही हिमाचल प्रदेशातील चंबाघाट जिल्ह्यातील सोलन येथील एका कारखान्यात झाली आहे तर विक्री व्यवस्था दिल्लीमधील सर्जा मार्केट परिसरातील एका कंपनीकडे आहे.

दोन्ही गोळ्यांची विक्री कंपनी आयएसओ मानांकित
कचराकुंडीत ज्या कंपनीच्या दोन वेगवेगळ्या औषधी गोळ्या कचराकुंडीत फेकण्यात आल्या आहेत, या दोन्ही गोळ्यांची निर्मिती करणारी हिमाचल प्रदेशातील चंबाघाट जिल्ह्यातील सालेन स्थित ही कंपनी ही आयएसओ मानांकित आहे. २००८ मध्ये या कंपनीस हे मानांकन मिळाले आहे. आयएसओ मानांकन असलेल्या कंपनीच्या औषधी गोळ्याच खपत नसल्याने कचराकुंडीत टाकल्या जात असतील तर अन्य किरकोळ कंपन्यांच्या औषधांचा फंडा काय असेल असा प्रश्‍न कचराकुंडीतील या औषधी गोळ्यांकडे पाहणाऱ्यांना पडला. 

औषध विक्री व्यवस्थेमध्ये फारशी प्रचलित नसलेल्या या गोळ्यांची छापील किंमत एवढी महागडी असली तरी प्रत्यक्षात ही कंपनी किमान पन्नास टक्‍क्‍यांपासून ते अगदी दोनशे टक्‍क्‍यांपर्यंतच्या नफा विक्रेत्यांच्या साखळीस मिळेल अशा पद्धतीने या गोळ्यांची विक्री करीत असते. या कंपनीच्या औषधांची शक्‍यतो मिरजेतील प्रतिष्ठित डॉक्‍टरांकडून या गोळ्यांची रुग्णांना फारशी शिफारस केली जात नाही. भरपूर नफा आणि डॉक्‍टर मंडळींना भरभरून बक्षिसे देऊनही केवळ समाधानकारक परिणाम दिसत नसल्याने डॉक्‍टर मंडळी या औषधाची शिफारस करीत नसल्याचे समजते. 

याच कचराकुंडीत टाकलेल्या अन्य दुसऱ्या औषधांच्या गाळ्या या मूत्राशयातील विकारांवर उपचार करण्यासाठीच्या आहेत. त्यांचे उत्पादन करणारी आणि विक्री करणारी कंपनीही वरील गोळ्यांचीच आहे. तिचे उत्पादन करणारी कंपनी आणि विक्री करणारी कंपनी ही एकच असून या गोळ्यांची कालबाह्य मुदत ही एप्रिल २०१८ ही आहे. या गोळ्यांची निर्मिती २०१५ मधील आहे. मुदत संपण्यापूर्वीच या गोळ्या कचराकुंडीत का टाकण्यात आल्या, असाही संभ्रम या गोळ्या कचराकुंडीत टाकल्यामुळे निर्माण झाला आहे.

याबाबत औषध प्रशासन विभागाकडे चौकशी केली असता मुदतबाह्य औषधांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे येत असल्याचे सांगितले. पण याच कचराकुंडीत मुदत न संपलेल्या महागड्या औषधी गोळ्या टाकण्यात आल्याने त्याबाबत काय कारवाई करायची याची चौकशी करण्यासाठी औषध प्रशासन विभागाच्या आधिकाऱ्यांनी सायंकाळी उशिरा या कचराकुंडीची पाहणी केली. याबाबत कारवाईचा निर्णय शुक्रवारी होणार असल्याचे या आधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Sangli News drug medicines in waste issue in Miraj