‘जन्मजात व्यंगाचा ग्रहणांशी संबंध नाही’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

सांगली - ग्रहण पाळल्याने नव्हे तर त्याबाबतच्या अज्ञानाने खूप मोठे दुष्परिणाम होत आहेत. नवजात मुलांमधील व्यंगाची कारणे अनेक आहेत. त्याकडे डोळेझाक करून ग्रहणाकडे बोट दाखवणे म्हणजे नव्या प्रश्‍नांना जन्म देण्यासारखे आहे, असे मत आज विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सांगली - ग्रहण पाळल्याने नव्हे तर त्याबाबतच्या अज्ञानाने खूप मोठे दुष्परिणाम होत आहेत. नवजात मुलांमधील व्यंगाची कारणे अनेक आहेत. त्याकडे डोळेझाक करून ग्रहणाकडे बोट दाखवणे म्हणजे नव्या प्रश्‍नांना जन्म देण्यासारखे आहे, असे मत आज विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले.

इंडियन मेडिकल असोसिएशन व मधुरांगण व्यासपीठाच्या वतीने आयोजित ‘ग्रहण खरेच धोकादायक असते का?’ या विषयावरील परिसंवाद झाला. खगोलशास्त्राचे तज्ज्ञ आनंद घैसास, सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. असित नाटेकर, शंतनू अभ्यंकर, डॉ. प्रिया पाटील, डॉ. संजय निटवे यांनी या परिसंवादात भाग घेतला. येथील मराठा समाज भवनात हा कार्यक्रम झाला.

डॉ. संजय निटवे म्हणाले, ‘‘ग्रहण काळात गर्भवती मातेस उपाशी ठेवले जाते. त्यामुळे शरीरातील साखर कमी होते. ग्रहण काळात 
बाहेर जाणे टाळल्याने गरजेचे वैद्यकीय उपचार टाळले जातात. त्यातून गंभीर समस्या तयार होतात. अनेक गरोदर महिलांना कामावर जाऊ दिले जात नाही. असे अनेक सामाजिक दोष ग्रहणांच्या अज्ञातातून तयार झाले आहेत.’’

डॉ. प्रिया पाटील म्हणाल्या,‘‘गर्भाच्या वाढीबाबत आता स्वतंत्रपणे गर्भविकासशास्त्रच विकसित झाले आहे. पहिल्या दोन महिन्यांतच बाळाचे सर्व अवयव तयार झालेले असतात. पुढील सात महिन्यांत गर्भाची विविध अंगाने वाढ होते. ओठांची वाढ तर आठव्या आठवड्यातच पूर्ण होते. ओठातील दोष जनुकीय दोषांमुळे वा फोलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी १२ कमतरतेमुळे होत असतात. दारू तंबाखूचे वा आईने केलेल्या औषध सेवनामुळेहे व्यंग येते. झटके येण्याच्या विकारावरील काही गोळ्यांमुळे ओठ व टाळू जुळून येत नाहीत.’’

डॉ. नाटेकर म्हणाले,‘‘बाळाची वाढ प्रत्येक टप्प्यावर जाणून घेणे गरजेचे असते. त्यासाठी  सोनोग्राफी तंत्राचा वापर केला जातो. ओठाचे फाटणे, बोटांचे चिरणे व्यंग काही आठवड्यातच लक्षात येते. अधिक तपासण्यांद्वारे  हृदय, मेंदू दोषही लक्षात येऊ शकतात. अशावेळी गर्भपाताचा पर्याय निवडावा लागतो. ओठ दुभंगले असतील ते प्लास्टीक सर्जरीद्वारे जोडले जाऊ शकतात.’’

यावेळी आनंद घैसास यांनी खगोलशास्त्राची माहिती दिली. ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. बी. एम. पाटील यांनी उपक्रमांची माहिती दिली. डॉ. निटवे यांनी परिचय करून दिला. यावेळी ‘सकाळ’चे बातमीदार जयसिंग कुंभार  यांनी पाहुणे व वक्‍त्यांचा सत्कार केला. ‘मधुरांगण’च्या समन्वयक प्रियंका साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले.
 

Web Title: Sangli News Eclipse and Birth defect issue