इस्लामपूर पालिकेच्या प्रभाग एकमध्ये 1681 बोगस मतदार - भाजप

इस्लामपूर पालिकेच्या प्रभाग एकमध्ये 1681 बोगस मतदार - भाजप

इस्लामपूर - शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये सुमारे १६८१ बोगस मतदारांचा समावेश असून एक ज्येष्ठ माजी नगरसेवक त्याला जबाबदार आहेत. त्यांच्यासह जे-जे या बोगस नोंदींना जबाबदार असतील, अशा सर्वांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करावा तसेच या प्रभागाची फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील आणि शहराध्यक्ष अशोक खोत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, नगरसेवक वैभव पवार प्रमुख उपस्थित होते.

श्री. पाटील व खोत म्हणाले, "गेली अनेक वर्षे सातत्याने या प्रभागाचे नेतृत्व करणाऱ्या ज्येष्ठ नगरसेवकांनी काही अधिकारी, पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून शहराबाहेरील लोकांची नावे त्यांच्या सोयीने नोंदवली आहेत. हे मतदार कर्नाटकमधील गुलबर्गा तसेच बीड भागातील काही ऊसतोड मजूर आहेत. प्रभागात एकाच घरात १३२ मतांची संख्या आहे. ज्यात सर्वधर्मीय लोकांच्या बोगस नोंदी आहेत. घर एकच आणि आडनावे वेगळी अशी स्थिती आहे. पालिकेकडे या घरांची नोंद नवीन घर म्हणून आहे; मात्र त्यांचा क्रमांकच अस्तित्वात नाही. हे घर क्रमांक आणि दुबार मतदान यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बोगस नोंदी आणि मतदान करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे."

येत्या पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, प्रसंगी आत्मदहनही करू, असा इशारा खोत यांनी दिला. ते म्हणाले, "५१३९ मतांचा हा प्रभाग आहे, इथे प्रत्यक्ष ३२००च रहिवासी राहतात. २८०० च्या वर नोंदीच नाहीत. बाहेरील मतदार इथला नगरसेवक ठरवत असतील तर स्थानिकांच्या मताला काय किंमत राहिली?" विकास आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते.

पत्रपंडितांचा 'आधार'
बोगस नावांनी रेशनधान्य देखील उचलले जाते, असा आरोप करून खोत म्हणाले, "त्यांना एका ज्येष्ठ पत्रपंडिताची मदत मिळत असल्याने ते वाचलेत. याबाबत जिल्हा पोलिस प्रमुखांकडेही तक्रार करणार आहोत."

काही पक्षांनी सतत या बोगस नोंदींवर विजय मिळवला आहे. ही फक्त एका प्रभागाची स्थिती नाही तर संपूर्ण तालुक्याची आहे. १० ते १६ हजार बोगस मतदान आहे. तालुक्यातील ही घाण स्वच्छ करण्याची मोहीम आता भाजपने हाती घेतली आहे."
- निशिकांत पाटील,
नगराध्यक्ष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com