साखर दरात घसरणीने कारखान्यांची दमछाक

साखर दरात घसरणीने कारखान्यांची दमछाक

सांगली - राज्यातील साखर हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू झाला. दीड महिन्यात साखरेचे दर प्रतिक्विंटल तीन हजार ६५० वरून सध्या तीन हजार १०० रुपयांपर्यंत खाली घसरले. परिणामी साखर कारखान्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर देणेही अशक्‍य होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

या पार्श्‍वभूमीवर केंद्राने साखर साठ्यावरील नियंत्रण मागे घेऊन साखरेचे दर घसरणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे. तरीही यंदा कारखान्यांकडून पहिले बिल मिळण्यासही विलंबाची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. दरातील घसरणीमुळे राज्य बॅंकेकडून सध्याच्या दरावर केवळ दोन हजार ६२५ रुपये उचल मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांतर्फे यंदाची पहिली उचल प्रतिटन दोन हजार ९०० ते तीन हजार ५० रुपये दिली जात आहे. हा फरक कसा भरून काढायचा, असा प्रश्‍न आहे. 

  •  जागतिक बाजारपेठेत साखरेचा दर देशापेक्षा कमी 
  •  नियंत्रण उठविल्याने साखर दरातील घसरण थांबण्यास मदत
  •  केंद्र सरकारने दर घसरणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे 
  •  कारखान्यांकडून ‘एफआरपी’ देण्यासाठीही विलंब शक्‍य...

कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन आठ-दहा दिवस होतात न होतात, तोच साखर दरात प्रतिक्विंटल ५० रुपयांची घसरण झाली. १०० ते २५० रुपयांच्या घसरणीने तीन हजार ६५० वरून सध्या तीन हजार १०० रुपयांपर्यंत दर खाली आला. ही घसरण अशीच सुरू राहिली, तर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना उसाची एफआरपी देणेही अवघड होणार आहे. साखरेचे दर वाढल्यानंतर परदेशातून साखर आयात करणार, असे म्हणणाऱ्या केंद्राने आता दर कमी होताना तीन हजार ५०० रुपये दर स्थिर कसा राहिला, याचा विचार केला पाहिजे. साखरेचा क्विंटलमागे तीन हजार ५०० रुपयांवर दर जाऊ दिला नाही. आज मात्र दर कोसळत आहेत. गेल्या वर्षीपेक्षा सुमारे ३०० रुपये एफआरपीत वाढ झाली. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचा दर सरासरी दोन हजार ९०० ते तीन हजार ५० रुपये प्रतिटन झाला. याचा विचार करून साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.

केंद्रीय अन्न, ग्राहक संरक्षण मंत्रालयाने काल (ता. १९) साखर साठ्यावरील नियंत्रण उठविले. त्यांची तातडीने अंमलबजावणी सुरू झाल्याने साखरेचे दर स्थिर राहण्यास मदत होईल, असा अंदाज आहे. सन २०१७-१८ या हंगामात वर्षात २४९ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. देशाला यंदा २५० लाख टन साखरेची गरज आहे. गेल्या वर्षीचा शिल्लक साठा ४० ते ४५ लाख टन आहे. साखर व्यापारी, उद्योजकांना साठ्याची मर्यादा पाच हजार क्विंटल होती. ती उठवली आहे. त्यामुळे साखरसाठा केला जाऊन दर स्थिर राहील, अशी अपेक्षा आहे.

साखर दरातील घसरणीवर सरकारने घरगुती वापरासाठी २० टक्के साखर कमी दरात आणि ८० टक्के साखर उद्योजक वापरतात. त्यांच्यासाठी जादा दराने विक्री केली पाहिजे. साखर निर्यातीवर २० टक्के कर लावण्याऐवजी जागतिक दर कमी असल्याने प्रतिक्विंटलला ३००-४०० रुपये अनुदान देऊन साखर निर्यात केली पाहिजे. आयात साखरेवर जादा कर आकारला पाहिजे.
- पी. आर. पाटील,
अध्यक्ष, राजारामबापू साखर कारखाना

देशांतर्गत साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्राने साखर साठ्यावरील निर्बंध हटविले, हे चांगले झाले. जागतिक बाजारपेठेचा विचार करता देशात साखरेला मिळणारा दर चांगला आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदाच होत आहे. भविष्यात दर घसरणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
- संजय कोले,
शेतकरी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com