म्हैसाळ योजना पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

म्हैसाळ योजना पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

मिरज - ताकारी व टेंभू पाणीयोजनांना शासनाने निधी पुरविल्याने त्या सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. म्हैसाळ योजनेबाबत मात्र भारतीय जनता पक्ष सरकार दुजाभाव करीत आहे, असा आरोप पूर्व भागातील लोकप्रतिनिधींनी केला.

दुष्काळी भागातील आमदार योजनेसाठी विधिमंडळात ताकद लावत असताना मिरजेच्या आमदारांनी मात्र योजनेला वाऱ्यावर सोडल्याचे ते म्हणाले. तहसीलदार शरद पाटील यांना त्यांनी निवेदन देऊन योजना त्वरित सुरू करण्याची मागणी केली. 

पंचायत समितीतील काँग्रेसचे पक्षप्रतोद अनिल आमटवणे, सदस्य कृष्णदेव कांबळे, माजी सभापती दिलीप बुरसे, सलगरेचे सरपंच तानाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब हुळ्ळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय काटे, मालगावचे माजी सरपंच प्रशांत माळी आदींनी पत्रकार बैठकीत भूमिका मांडली.

ते म्हणाले, की थकबाकीच्या नावाखाली म्हैसाळ योजना बंद पाडण्याचा डाव भाजप शासन आखत आहे. गेल्या जूनमध्ये पावसाने दडी मारलेली असताना योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी टंचाई निधीतून मदत देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले; मात्र आजतागायत हे पैसे जमा झालेले नाहीत. थकबाकीचा आकडा फुगला आहे. 

विटा-खानापूरच्या आमदारांनी विधिमंडळात ताकद पणाला लावली. टेंभू-ताकारीसाठी निधी खेचून आणला. येत्या काही दिवसांत तेथे पाणी उपसा सुरू होईल. म्हैसाळ योजनेबाबत मात्र थकबाकीचे रडगाणे कायम आहे. भाजप सरकार मदतीचा हात देत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात लोटला जात आहे. मिरजेच्या आमदारांना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास फुरसत नाही. योजना सुरू करण्याची मागणी केली तर पैसे भरा, असे ते म्हणतात. त्यांनी प्रथम टंचाई निधीचे पैसे मुख्यमंत्र्यांकडून मिळवावेत; मगच शेतकऱ्यांकडे पैसे मागावेत. येत्या १० जानेवारीपर्यंत योजना सुरू केली नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरतील. या वेळी रावसाहेब पाटील, माजी सभापती खंडेराव जगताप, आरगचे ग्रामपंचायत सदस्य गणेश देसाई, तुषार खांडेकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com