सांगलीत बेळुंखीच्या शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

सांगली - जनावरांच्या शेड बांधकामासाठी सरकारी योजनेचे मंजूर पैसे वेळेवर मिळत नसल्याने संताप व्यक्त करत बेळुंखी (ता. जत) येथील शेतकरी गोरख बजाबा केंगार यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी त्यांनी रॉकेल ओतून घेतले.

सांगली - जनावरांच्या शेड बांधकामासाठी सरकारी योजनेचे मंजूर पैसे वेळेवर मिळत नसल्याने संताप व्यक्त करत बेळुंखी (ता. जत) येथील शेतकरी गोरख बजाबा केंगार यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी त्यांनी रॉकेल ओतून घेतले. त्यामुळे पोलिस, प्रशासनाची तारांबळ उडाली. प्रशासनाला हात जोडून विनवण्या केलेली भाषा कळत नाही, माणसांनी पेटवून घ्यायचीच वेळ आणलीय, असा संपात व्यक्त करत त्यांनी व्यवस्थेवर बोट ठेवले. 

गोरख केंगार या पन्नाशी उलटलेल्या शेतकऱ्याने शेड बांधकामासाठी रोजगार हमी योजनेतून पैसे मंजूर करून घेतले. त्याचा सहा हजार रुपयांचा हप्ता मिळाला. त्यासह लोकांकडून उसनवारी करून शेडचे काम केले, मात्र उर्वरीत रक्कम द्यायला प्रशासनाकडून टाळाटाळ सुरु झाली. आज या, उद्या या, असे फेरे सुरु झाले. त्यासाठी आवश्‍यक ती कागदपत्रांची पूर्ण पूर्तता करून दिली. तरीही पैसे मिळाले नाहीत.

दुसरीकडे पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल मंजूर झाले, मात्र त्याचा एकही हप्ता मिळाला नाही. जत व कवठेमहांकाळ तालुक्‍यात केंगार यांच्यासोबत मंजूर झालेल्या घरकुलांचे बांधकाम पूर्णत्वास आले. तरी त्यांना पै मिळाली नाही, असा आरोप करत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी वारंवार केली. मंत्र्यापर्यंत निवेदने दिली, तरीही काही होत नसल्याने जीव देण्याचा पर्याय निवडला, अशी कैफियत केंगार यांनी मांडली. 

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या प्रकाराने एकच खळबळ उडाली. केंगार यांनी अंगावर पूर्ण रॉकेल ओतून घेतले होते. त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. या साऱ्या प्रकरणावर निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी जतचे गटविकास अधिकारी व तहसिलदारांशी तत्काळ संपर्ण साधून चौकशीचे आदेश दिले.

Web Title: Sangli News farmer commuted to suicide