कर्जमाफीसाठी घोषणापत्रासह ऑनलाईन अर्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

सांगली - राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला तरी यात रोज नवनव्या नियमांची भर पडते आहे. 

सांगली - राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला तरी यात रोज नवनव्या नियमांची भर पडते आहे. 

कर्जमाफीसाठी सोमवारपासून अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील अनेक अटींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीतून बाद होण्याचीच शक्‍यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या घोषणापत्रातील माहिती चुकीची दिली असल्यास मिळालेली लाभाची रक्कम व्याजासह परत देण्याचा उल्लेख घोषणापत्रात आहे. शेतकरी कुटुंबातील एकानेच अर्ज भरणे बंधनकारक आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांना मोबाईलवर तो मिळाल्याबद्दल एसएमएसद्वारे माहिती दिली जाणार आहे. शेतकऱ्यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७’ या  योजनेसाठीचे नमुने आता गावपातळीवर उपलब्ध होत आहेत. सेतू कार्यालयातून शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रस्ताव दाखल करावे लागणार आहेत. राज्य शासनाने २८ जूनला कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर कर्जमाफीच्या अनुषंगाने दररोज नवी माहिती, नियम, अटी येत गेले. कर्जमाफीतून कोणाला वगळले जाणार त्याचेही निकष सरकारने जाहीर केले. आता कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना घोषणापत्र द्यावे लागणार आहे. घोषणापत्रातील माहिती खोटी अथवा दिशाभूल करणारी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यास प्रोत्साहनपर मिळालेल्या लाभाची रक्कम व्याज-दंडासह वसुलीला तयार असल्याचे शेतकऱ्यांना त्यात नमूद करावे लागणार आहे. 

कर्जमाफीसाठी घोषणापत्रासह ‘आधार क्रमांक’ ही सक्तीचा केला आहे. जन्मदिनांक, मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक आदींबाबत तपशील अर्जात समाविष्ट करावा लागणार आहे. एकाच शेतकऱ्याने एकापेक्षा अधिक बॅंकांतून कर्ज घेतले असल्यास तेही नमूद करावे लागणार आहे. आधार नसेल तर नव्याने नोंदणी करून त्यांचा क्रमांक नोंदवावाच लागणार आहे. 

अर्ज भरल्यावर एसएमएस येणार 
घोषणापत्र ब मध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचे मिळून दीड लाखापर्यंतचे कर्ज व व्याज माफीस पात्र आहे. दीड लाखाहून अधिक असणारी रक्कम भरण्याच्या अटीस अधिन राहून कर्जमाफी मिळणार आहे. सन २०१५-१६, तसेच २०१६-१७ पीक कर्जाची विहीत मुदतीत फेड केल्यापोटी प्रोत्साहन अनुदान लाभास पात्र आहे. सन २०१५-१६ पर्यंतच्या पुनर्गठीत केलेल्या कर्जासही लाभास पात्र असे वर्गीकरण आहे. अर्जदारास पती-पत्नी, १८ वर्षांखालील व्यक्तींच्या नावाने कर्ज घेतले असल्यास ती माहिती भरणे बंधनकारक आहे. कुटुंबातील एकानेच अर्ज भरणे बंधनकारक आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांना मोबाईलवर तो मिळाल्याबद्दल एसएमएसद्वारे माहिती दिली जाणार आहे. 

Web Title: sangli news farmer online