मदत नसली तरी निदान खोडा घालू नका: संजय पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

सांगली : म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या चांगल्या कामात मदत करता आली नाही तरी निदान खोडा घालणे योग्य नव्हते, अशा शब्दात खासदार संजय पाटील यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता टीका केली. कोणाला नामोहरम करणे हा उद्देश नाही, परंतू शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्‍नासाठी सर्वांनी गटतट, पक्ष विसरून एकत्र यायला पाहिजे असेही ते म्हणाले.

सांगली : म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या चांगल्या कामात मदत करता आली नाही तरी निदान खोडा घालणे योग्य नव्हते, अशा शब्दात खासदार संजय पाटील यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता टीका केली. कोणाला नामोहरम करणे हा उद्देश नाही, परंतू शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्‍नासाठी सर्वांनी गटतट, पक्ष विसरून एकत्र यायला पाहिजे असेही ते म्हणाले.

म्हैसाळ योजनेसाठी 15 कोटी रूपयाचा निधी मिळाल्यानंतर आज खासदार पाटील यांनी आज म्हैसाळ येथे बटण दाबून योजना सुरू केली. त्यानंतर सांगलीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""म्हैसाळ योजनेचा प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने अखेर मार्गी लागला आहे. उपसा सिंचन योजनेच्या बिलासाठी 81 आणि 19 टक्के फॉर्म्युल्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

ताकारी-म्हैसाळ आणि टेंभू योजनेला त्याचा फायदा होणार आहे. दोन्ही योजनांची थकबाकी वाढत चालली होती. ताकारी-टेंभूची थकबाकी कमी होती. परंतू म्हैसाळची बाकी वाढली होती. त्यातून मार्ग काढणे गरजेचे होते. योजना बंद राहिली असती तर शेतकऱ्यांचे भरून न येणारे नुकसान झाले असते. मदत व पुनर्वसनमधून निधी मिळण्यात अडचण होती. त्यामुळे कृष्णा खोरेच्या महामंडळाच्या स्वीयनिधीतून पाठपुरावा सुरू केला. अखेर पाणीपट्टीमधून पैसे देण्याची घोषणा झाली.''

खासदार पाटील म्हणाले, "म्हैसाळच्या थकबाकीसाठी 15 कोटी मिळाले. राज्यसरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे आहे. आता 50 टक्के पैसे आले. उर्वरीत पैशासाठीही मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. म्हैसाळच्या पाण्याचा प्रश्‍न महत्वाचा असल्यामुळे दिल्लीतील अधिवेशन सोडून मुंबईत आलो. ज्या शेतकऱ्यांनी निवडून दिले त्यांच्याशी प्रतारणा नको म्हणून प्रयत्न केले. योजना सुरू करावी यासाठी शेतकरी आक्रमक होते. त्यांना संयम ठेवण्याची विनंती केली. निधीसाठी खासदारकी पणाला लावली. राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे बराचवेळच्या चर्चेनंतर रात्री दीड वाजता प्रश्‍न सुटला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पैसे देण्याचा निर्णय घेतला.''

म्हैसाळच्या निमित्ताने माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता त्यांचा उल्लेख टाळत खासदार पाटील म्हणाले, "शेतकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्‍नांवर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे होते. परंतू काहींनी राजकारणाचे स्वरूप आणले. चांगल्या कामात मदत करता आली नाही तरी निदान खोडा घालू नये. परंतू केविलवाणा प्रयत्न केला गेला. मला कोणाला नामोहरम करायचे नाही. परंतू यामध्ये मदत करण्याची भूमिका घ्यायला हवी होती.''

Web Title: sangli news farmer politics mp sanjay patil