सांगली - "डीवायएसपी'ने शेतकऱयांना झोडपले ?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

कार्यकर्ते घोषणा देतच पोलिस ठाण्यात गेले. ते आवरणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर पोलिस उपाधीक्षक धीरज पाटील यांना पाचारण करण्यात आले. पाटील यांनी पहिल्यांदा सबुरीने घेतले. मात्र क्षणात 'उचला' असा आदेश दिल्यानंतर आंदोलकांना कॉलरला धरून, दंड पकडून गाडीत ढकलण्यात आले

सांगली - शेतकऱ्यांच्या आंदोलनात मिरजेचे पोलिस उपाधीक्षक धीरज पाटील यांनी आंदोलकांना पोलिस गाडीत बसवून काठीने झोडपून काढले आहे. त्यांनी ही कारवाई कोणत्या कारणास्तव आणि कोणत्या कलमानुसार केली, याची चौकशी करा. त्याआधी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी लेखी फिर्याद जनता दलाचे अध्यक्ष ऍड. के. डी. शिंदे यांनी आज विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली. 

शेतकरी संपाला पाठींबा देत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज तीव्र आंदोलन केले. आमदारांच्या घराला टाळे ठोकण्यासाठी कॉंग्रेससह स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेकाप, माकपचे कार्यकर्ते जमले होते. त्यांना विश्रामबाग पोलिस ठाण्यात नेण्यात आले. हे कार्यकर्ते घोषणा देतच पोलिस ठाण्यात गेले. ते आवरणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर पोलिस उपाधीक्षक धीरज पाटील यांना पाचारण करण्यात आले. पाटील यांनी पहिल्यांदा सबुरीने घेतले. मात्र क्षणात 'उचला' असा आदेश दिल्यानंतर आंदोलकांना कॉलरला धरून, दंड पकडून गाडीत ढकलण्यात आले. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल साईटवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या घटनेनंतर डीवायएसपी पाटील यांनी गाडीत जावून आंदोलकांना काठीने मारहाण केल्याचे व पोलिस निरीक्षक राजू मोरे यांनी त्याला साथ दिल्याचे ऍड. शिंदे यांनी लेखी फिर्यादीत म्हटले आहे. 

या आंदोलनात स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते महेश खराडे, सांगली सुधार समितीचे ऍड. अमित शिंदे, माकपचे उमेश देशमुख, हमाल नेते विकास मगदूम आदींचा समावेश आहे. त्यांना सध्या तासगाव येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.  

Web Title: sangli news: farmer strike police