शेतकऱ्यांचा दणका, शिवारात भडका

देवराष्ट्रे - येथे शेतकऱ्यांनी दुधाचा टेम्पो अडवून दूध ओतले.
देवराष्ट्रे - येथे शेतकऱ्यांनी दुधाचा टेम्पो अडवून दूध ओतले.

सांगली - अजब झालं, गजब झालं... शेतकरी संपावर गेला... इतिहासात पहिल्यांदा हे घडलं. ऊन, वारा, पाऊस कशाची तमा न बाळगता जुगार खेळणारा शेतकरी थांबला... नुसता थांबला नाही तर रस्त्यावर उतरला.

त्याचा परिणाम मुंबई-पुण्याच्या बाजारावर होणार आहेच; मात्र सांगलीतील फळे आणि भाजीपाला बाजारालाही पहिल्याच दिवशी झळा बसल्या.

भाजीपाल्याची आवक घटली आणि सर्वत्र शेतकरी संपाचीच चर्चा सुरू झाली. जिल्हा प्रशासन, पोलिस दरासह बाजार समित्यांनी डोळे-कान उघडे ठेवून या घडामोडींचा कानोसा घेतला. 

शेतकरी संपावर जाणार म्हणजे काय रं भाऊ? अशी चर्चा गेला महिनाभर सुरू होती. ना कुठलं कार्यालय, ना इमारत, ना एसी, ना पंखा... ना कुणी साहेब, ना शिपाई... मग संप कसला? कसा करणार अन्‌ तो दिसणार कसा? याची चर्चा रंगत होती. ती आज प्रत्यक्ष येताना दिसली. दूध टॅंकर अडवण्यापासून ते गाड्या फोडण्यापर्यंत आक्रमकतेने आंदोलन सुरू झाले.

त्यात जिल्ह्यातील सहभागाविषयी विशेष चर्चा होती. कारण वाळवा, मिरज पश्‍चिम भाग, पलूस हा पट्टा तर भाजीपाला उत्पादनासह दूध उत्पादनात अग्रेसर आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि दिल्लीच्या बाजारात भाजीपाला पाठवण्याचे थांबवले गेले. वाहने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी  रोखल्याने विष्णुअण्णा पाटील बाजारात फळे व भाजीपाल्याच्या आवकेत मोठी घट झाली. काल कांद्याची आवक २ हजार ५३४ क्‍विंटल होती. आज ६६३ क्विंटल आवक झाली. बटाटा आवक स्थिर आहे. संपाचा फळ आवकेवर अल्प  परिणाम झाला. कालची आवक - डाळिंब २४५० डझन, चिकू ६६० डझन, कलिंगड ६१२ डझन, रत्नगिरी आंबा ७९४ पेटी, कर्नाटक आंबा १६०० पेटी तर बॉक्‍समध्ये ५०६६ बॉक्‍स एवढी होती. आज डाळिंब ७६७ डझन, चिकू आवक झाली नाही, कलिंगड २५४ डझन, रत्नागिरी २४५३ पेटी, कर्नाटक ४०० पेटी, ३५१७ बॉक्‍स एवढी झाली. मार्केटचे सहसचिव डी. बी. जाधव म्हणाले, ‘‘संपामुळे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. माण, फलटण, नगर येथून येणाऱ्या कांद्याची वाहने अडवल्याने आवक पुन्हा कमी होईल.’’
हमालाचे संघटनेचे अध्यक्ष शामराव पेटर्गे म्हणाले, ‘‘फळ व भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने हमाल दिवसभर बसून आहेत. एका हमालाची दररोजची कमाई ८०० रुपये होते. सात दिवस संप असल्याने मोठे नुकसान होईल.’’

मार्केटचे सहसचिव डी. बी. जाधव, व्यापारी राजेश पोपटांनी म्हणाले, ‘‘शिल्लक शेतमालाचा आज सौदा झाला. नवीन आवक नसल्याने दरवाढ झाली.’’

सांगलीवर ताण शक्‍य
दक्षिण भारतातून येणारा भाजीपाला व अन्य शेतमाल मुंबई, पुण्याच्या दिशेने जाऊ द्यायचा नाही, असा शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. परिणामी, हा माल सांगलीच्या बाजारात येण्याची शक्‍यता. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांनी वर्तवली आहे. 
 

भाजी बाजारावर ३० टक्के परिणाम
पश्‍चिम भागातील  आवक थांबली
दूध संकलन झाले, मात्र वाहतूक थांबली
चिलिंग प्लॅंटची क्षमता असेपर्यंत संकलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com