म्हैसाळच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

संतोष भिसे
गुरुवार, 15 मार्च 2018

मिरज - म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. मिरजेत म्हैसाळ रस्त्यावरील उड्डाण पुलावर रस्ता रोको केला. सुमारे पंधरा मिनिटे चाललेल्या आंदोलनाने महाराष्ट्र-कर्नाटकादरम्यानची वाहतुक ठप्प झाली. पाणी उपशाची तयारी सुरु असल्याची माहीती तहसीलदारांनी दिल्यानंतर आंदोलक मागे हटले. 

मिरज - म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. मिरजेत म्हैसाळ रस्त्यावरील उड्डाण पुलावर रस्ता रोको केला. सुमारे पंधरा मिनिटे चाललेल्या आंदोलनाने महाराष्ट्र-कर्नाटकादरम्यानची वाहतुक ठप्प झाली. पाणी उपशाची तयारी सुरु असल्याची माहीती तहसीलदारांनी दिल्यानंतर आंदोलक मागे हटले. 

म्हैसाळ सिंचन योजनेतून उपसा सुरु करावा यासाठी गेल्या महिन्याभरापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी योजना सुरु करण्यास हिरवा कंदील देऊन आठवडा झाला तरी पंप सुरु झालेले नाहीत. मिरजेसह जिल्ह्याचा पूर्व भाग टंचाईच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी आज रस्त्यावर आले. उड्डाण पुलावरुन महाराष्ट्र-कर्नाटकदरम्यानची वाहतुक होते; ती रोखून धरली. सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

उपशासाठी दोन महिन्यांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे; पण पाणी अद्याप कालव्यात पडलेले नाही. गेल्या रविवारी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा इशारा आम्ही दिला होता; तरीही पंप सुरु झालेले नाहीत. दोन दिवसांत उपसा सुरु झाला नाही तर व्यापक आंदोलन छेडणार आहोत.

- मनोज शिंदे

शेतकरी पाण्यावाचून होरपळत असताना सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला. म्हैसाळ योजनेचे पाणी आमच्या हक्काचे असल्याचा दावा केला. आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी थोपवून धरले. यादरम्यान दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. 

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे, जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, पंचायत समितीतील पक्षप्रतोद अनिल आमटवणे, प्रा. सिद्धार्थ जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब हुळ्ळे, शिवसेनेचे चंद्रकांत मैगुरे, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बी. आर. पाटील आदींनी नेतृत्व केले. 

आंदोलनात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेतकरी संघटना इत्यादी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले. सलगरेचे सरपंच तानाजी पाटील, गणेश देसाई, दिलीप बुरसे, गंगाधर तोडकर, संजय काटे, महावीर खोत, वसंतराव गायकवाड, सुभाष खोत, प्रकाश कांबळे, राजू वैद्य, शाम देसाई, नंदू कोल्हापुरे, अनिल कब्बुरे, राजेश जमादार, तुषार खांडेकर, प्रमोद इनामदार, तानाजी दळवी, सुजित लकडे, सूर्यकांत माळी, विराज कोकणे, शिवाजी महाडीक आदींनी भाग घेतला. 

Web Title: Sangli News farmers agitation Mahisal water issue