महामार्गाला जमिनी देण्यास मिरजेत शेतकऱ्यांचा विरोध

संतोष भिसे
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मिरज - रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी चुकीच्या पद्धतीने भूसंपादन सुरू असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आज मिरज-पंढरपूर रस्ता रोखून धरला. तानंग फाटा येथे आंदोलन करत वाहतुक अडवली. शेतकऱ्यांची भूमिका महामार्ग अधिकाऱ्यांना सांगण्याचे आश्वासन नायब तहसिलदार सोनवणे यांनी दिले, आंदोलकांचे निवेदन स्विकारले, त्यानंतर शेतकरी रस्त्यावरुन हटले. 

मिरज - रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी चुकीच्या पद्धतीने भूसंपादन सुरू असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आज मिरज-पंढरपूर रस्ता रोखून धरला. तानंग फाटा येथे आंदोलन करत वाहतुक अडवली. शेतकऱ्यांची भूमिका महामार्ग अधिकाऱ्यांना सांगण्याचे आश्वासन नायब तहसिलदार सोनवणे यांनी दिले, आंदोलकांचे निवेदन स्विकारले, त्यानंतर शेतकरी रस्त्यावरुन हटले. 

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, पंचायत समितीतील काँग्रेसचे पक्षप्रतोद अनिल आमटवणे, प्रा. सिद्धार्थ जाधव, शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे,  बाबासाहेब पाटील, नगरसेवक संजय मेढे, किसान सभा आदींच्या नेतृत्वाखाली  हे आंदोलन झाले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. 

रत्नागिरी - नागपूर महामार्गाचा बराच भाग मिरज तालुक्यातून जातो. त्यासाठी भूसंपादनाचे काम सध्या सुरु आहे. जमिनी मिळवण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात आजवर अनेक बैठका झाल्या आहेत. आंदोलकांनी सांगितले कि,  शेतकरी व अधिकारी यांच्यातील वाटाघाटीनंतर एक आराखडा निश्चित झाला होता. त्यानुसार भूसंपादनाची कार्यवाही करण्याचे ठरले होते. प्रत्यक्ष काम करतेवेळी हा आराखडा बाजूला ठेवत प्रशासनाने वेगळेच नकाशे तयार केले. नव्या आराखड्यामुळे  अनेक घरे, बागायती शेती, विहीरी, छोटे उद्योग नष्ट होणार आहेत. त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. 

प्रा. जाधव यांनी सांगितले कि, नव्या आराखड्यामुळे अनेक शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. आमदार सुरेश खाडे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आराखडा बदलला आहे.  याविरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतले आहे. तरीही जबरदस्तीने मोजणी सुरु आहे. मुठभरांच्या फायद्यासाठी शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

महेश खराडे म्हणाले, शेतकरी संघटना शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याविना राहणार नाही. 

आंदोलनात संकेत परब, गंगाधर तोडकर, धनराज सातपुते, अनिकेत परब, किशोर सावंत, अनिल येळझरे, गणेश दुर्गाडे, डॉ सुदर्शन घेरडे, दिगंबर कांबळे, पोपट बाबर, गौतम नागरगोजे आदींनी भाग घेतला. शेतकऱ्यांनी शासनाच्या व आमदार खाडेंच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Web Title: Sangli News farmers agitation on Miraj Pandharpur Road