ताकारी, टेंभूच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा हल्लाबोल

संतोष कणसे
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

शिष्टमंडळांसह मुख्यमंत्र्यांना भेटून ताकारी, टेंभूच्या नियमित आवर्तनासाठी नम्र आवाहन करणार आहे. तरीही पाणी नाही सोडले, तर भाजपच्या एकाही मंत्र्याना जिल्ह्यात फिरु देणार नाही. एवढी ताकद काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असा इशारा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांनी दिला.

कडेगाव - गेल्या अनेक दिवसापासून ताकारी, टेंभू सिंचन योजनेतून पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे पिके वाळू लागली असून शेतकरी पाण्यासाठी तडफडत आहेत. तरीही कोणी दखल घेत नाही. तेव्हा शिष्टमंडळांसह मुख्यमंत्र्यांना भेटून ताकारी, टेंभूच्या नियमित आवर्तनासाठी नम्र आवाहन करणार आहे. तरीही पाणी नाही सोडले, तर भाजपच्या एकाही मंत्र्याना जिल्ह्यात फिरु देणार नाही. एवढी ताकद काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असा इशारा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांनी दिला.

ताकारी, टेंभू योजनेचे आवर्तने नियमित सुरु करावीत तसेच या योजनेच्या पुर्णत्वासाठी भरीव निधी द्यावा या मागणीसाठी डॉ. विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आज येथील तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉ. विश्‍वजित बोलत होते.  जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भिमराव मोहिते, शांताराम कदम, जितेश कदम आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, ताकारी, टेंभू सिंचन योजना या दुष्काळी भागाच्या जीवनवाहिन्या आहेत. या डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नामुळे गेल्या पंधरा वर्षांत या सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागाचा कायापालट झाला आहे. परंतु राज्यातील भाजपचे सरकार हे ताकारी, टेंभू सिंचन योजना पाणीपट्टी व वीजबिलाचे कारण पुढे करुन जाणीवपुर्वक नियमित सुरु करीत नाही. मुख्यमंत्र्यांनी ठरविले तर, या सिंचन योजनांना पैसे मिळून योजना तात्काळ सुरु होवू शकतात. गेली पंधरा वर्षे डॉ. पतंगराव कदम मंत्री होते. त्यावेळी येथील शेतकऱ्यांना वेळेवर ताकारी, टेंभूचे पाणी मिळायचे. एका फोनवर योजनांचे पाणी सुटायचे. परंतु आज पिके वाळू लागली आहेत, शेतकरी पाण्यासाठी तडफडत आहेत तरीही पाणी सोडले जात नाही. शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत, तरी सुध्दा हे शासन दखल घेत नाही. हे दुर्दैवी आहे. वाढीव पाणीपट्टी कमी करणे व योजनेच्या अपुर्ण कामासाठी भरीव निधी मिळेपर्यंत आम्ही शासनाशी लढत राहू. 

येथील सुरेशबाबा देशमुख चौकातून डॉ. विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. तर तहसिल कार्यालयात मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.  जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भिमराव मोहिते, जितेश कदम, शिवाजी पवार, संभाजी जाधव आदींनी भाषणे केली. मोर्चाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश मोहिते, सोनहिराचे संचालक दिपक भोसले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित साळुंखे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव, उपनगराध्यक्ष साजीद पाटील, नगरसेवक सागर सूर्यवंशी, दिनकर जाधव, अविनाश जाधव, सुरेश देशमुख, सुरेश निर्मळ, मधुनाना भोसले, निवृत्ती जगदाळे, मालन मोहिते, शोभा होनमाने, श्‍वेता बिरनाळे, मुक्ता दिवटे, सरपंच विजय होनमाने, संतोष करांडे, टेंभूचे सहायक कार्यकारी अभियंता नरेंद्र घार्गे, ताकारीच्या सहायक अभियंता योगिता पाटील आदी  उपस्थित होते. 

विश्‍वजित कदम यांचा हल्लाबोल....

  • काही कारखान्यांनी ताकारी, टेंभूच्या पाणीपट्टीपोटी ऊसबिलांतून कपात केलेली दोन ते अडीच कोटींची रक्कम सिंचन योजनाकडे भरलेली नाही .हा कुठला कारखाना आहे हे तुम्ही समजून घ्या.

  • आम्ही मोर्चा काढला म्हणून पाणी न सोडण्याची हिंमत तरी करुन दाखवा.

  • सध्या राज्यात मुख्यमंत्र्याचे कोणी ऐकत नाही, मंत्री - मंत्र्याला विचारत नाही, आमदाराला कोणीही विचारत नाही, अधिकाऱ्यांवर वचक नाही. अशी अवस्था काँग्रेसच्या राजवटीत नव्हती.

  • परिवहन मंत्र्यांच्या हुकूमशाही विरोधात येथे डी. एस. देशमुख यांनी सुरु केलेल्या उपोषणाचीही शासनाकडून दखल नाही. 

एका आठवड्यात पाणी सोडले जाणार
ताकारी, टेंभूृचे आवर्तन तात्काळ सुरु करण्याबाबतचे निवेदन विश्‍वजित कदम यांचे हस्ते तहसिलदार अर्चना शेटे यांना देण्यात आले. यावेळी तहसिलदार, टेंभूचे सहायक कार्यकारी अभियंता व ताकारीच्या सहायक अभियंता यांचेशी चर्चा केलेनंतर डॉ. विश्‍वजित कदम यांनी एका आठवड्यात ताकारी, टेंभूू योजनांचे आवर्तन सुरु करुन शेतकऱ्यांना पाणी दिले जाणार असल्याचे उपस्थित मोर्चेकऱ्यांना सांगितले. 

Web Title: Sangli News Farmers agitation for water