तीन वर्षांनंतर निघणार शेतकऱ्यांची ‘फॉरेन टूर’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

सांगली - तीन वर्षांच्या खंडानंतर शेतकऱ्यांची विदेश सहल यंदा निघणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इस्त्राईल या तीन देशांची निवड झाली आहे. त्यासाठी जिल्ह्यातून ४७ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून लकी ड्रॉ पद्धतीने त्यांची क्रमवारी ठरवून तो अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.

सांगली - तीन वर्षांच्या खंडानंतर शेतकऱ्यांची विदेश सहल यंदा निघणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इस्त्राईल या तीन देशांची निवड झाली आहे. त्यासाठी जिल्ह्यातून ४७ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून लकी ड्रॉ पद्धतीने त्यांची क्रमवारी ठरवून तो अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. कोण कुठल्या विमानात बसणार हे राज्य सरकारचा कोटा निश्‍चित झाल्यानंतर ठरेल. मात्र पुन्हा एकदा शेतकरी सहलीचे विमान उडणार हे नक्की झाले आहे. 

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना सन २०१४ मध्ये शेवटची शेतकरी सहल निघाली होती. त्यानंतर भाजप सरकार आले. गेल्या तीन वर्षांत या विषयाकडे कानाडोळा झाला होता. ही योजना बंद पडते की काय, अशी साशंकता निर्माण झाली होती. यंदा अचानकपणे त्या योजनेला सरकारने हिरवा कंदील दाखवला आणि राज्यभरातून शेतकऱ्यांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे. या दौऱ्यासाठी होणाऱ्या एकूण खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम ही राज्य शासनाकडून अनुदान म्हणून दिली जाते. निम्मी रक्कम शेतकऱ्यांना खर्च करायची असते. या दौऱ्यात अत्याधुनिक शेती तंत्राचा अभ्यास केला जातो. त्यानिमित्ताने विदेश  दौऱ्याची संधी मिळत असल्याने अनेक शेतकरी उत्सुक असतात. यावर्षी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या नजीकच्या प्रगत देशांची निवड करण्यात आली आहे. तेथील  हवामान आणि शेतीतील आधुनिकीकरणाने जगभराचे  लक्ष वेधलेले आहे. इस्त्राईलचे शेती तंत्रातील योगदान जगाला दिशा देणारे आहेत. त्यामुळे या तीन देशांपैकी कुठेही संधी मिळाली तरी शेतकऱ्यांच्या हाती ज्ञानभांडार लागणार आहे. 

या दौऱ्यासाठी जिल्ह्यातून अर्ज मागवण्यात आले होते. ४७ जणांनी अर्ज केले होते. त्यांची लकी ड्रॉ पद्धतीने क्रमवारी ठरवण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांच्या उपस्थितीत ही  प्रक्रिया पार पडली. आता राज्य शासनाकडून किती जणांना संधी दिली जाते, यावर पुढील गोष्टी ठरणार आहेत.

Web Title: Sangli News Farmers foreign Tour