पशुसंवर्धन, कृषी मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गायीच्या दुधाचा अभिषेक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

राज्यशासनाने गाय उत्पादकांना लिटरला किमान 27 रुपये दर देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल राज्याचे पशुसंवर्धन मंत्री, कृषीमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना शेतकरी संघटनेने गायीच्या दूधाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिषेक घातला.

सांगली - गायीच्या दूधदरात खरेदीदार सहकारी व खासगी संघानी कपात केले आहे. कपातीवर राज्य शासन नियंत्रण आणू शकलेले नाही. राज्यशासनाने गाय उत्पादकांना लिटरला किमान 27 रुपये दर देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल राज्याचे पशुसंवर्धन मंत्री, कृषीमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना शेतकरी संघटनेने गायीच्या दूधाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिषेक घातला. जमावबंदी आदेश मोडल्याबद्दल पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

(व्हिडिआे - विजय पाटील) 

शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे संजय कोले, सुनिल फराटे यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की सध्या दूधाचा "पुष्ट' काळ सुरु आहे. या काळात संस्था दूध कमी दराने खरेदी करुन त्याची पावडर बनवतात. ती "कुश' काळात मिठाई, चॉकलेट, आईस्क्रिम, बिस्किट, बेबीफुड, बेकरी उत्पादक व लष्कराला अव्वाच्या सव्वा दराने विकतात. लोणी, तूप, लस्सी, सुगंधी दूध, आम्रखंड, श्रीखंड आदीसाठी दूध मोठ्या प्रमाणावर वापरतात. शेतकऱ्यांना दर कमी देवून लूट करतात. 

शासनाने गाईच्या दुधाला प्रतीलिटर दोन व म्हशीच्या दुधाला प्रतीलिटर तीन रुपये दरवाढीचे आदेश दिले. त्यानंतर महिनाभर शेतकरी उत्पादकांना कसातरी वाढीव दर मिळाला. वाढीव दर देणे अशक्‍य असल्याचे सांगून सहकारी, खासगी दूध संघानी संस्थांनी दरकपात केली. काही संघांनी दुधाचे दर 17 ते 20 रुपयांपर्यंत खाली आणले. सरकारी दरापेक्षा 7 ते 10 रुपयांनी दर कमी दिले जातात. "महानंद' नेही दर कमी केलेत.

उत्पादन खर्चापेक्षा दर कमी मिळतोय. दूध संघांनी मात्र विक्रीदर कायम ठेवलेत. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते आहे. तातडीने दरवाढ मिळावी नाही तर आंदोलन करू. 
संघटनेचे एकनाथ कापसे, मोहन परमणे, वसंत भिसे, अण्णा पाटील, शीतल राजोबा यांच्या निवेदनावर सह्या आहेत. 

Web Title: Sangli News Farmers Organisation agitation