‘फॅसिझम’विरोधात चित्रकारांचाच पहिला हुंकार - मंगेश काळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

सांगली - फॅसिझमचा सर्वांत पहिल्यांदा विरोध चित्रकारांनीच केला आहे. कोणताही कलावंत फॅसिझमचा विरोधकच असतो. सध्याच्या कालखंडात समाजातील बुद्धिजीवींनी व्यक्त होण्यासाठी व्यासपाठाची गरज पाहू नये, असे मत कला समीक्षक मंगेश काळे यांनी व्यक्त केले. येथील शांतिनिकेतनमधील कलाविश्‍व महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित कलासंवादात ते बोलत होते. ‘विरुपीकरण’ विषयावर त्यांचे कला प्रात्यक्षिक, संवाद आणि चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 

उद्योन्मुख चित्रकारांसमोर त्यांनी चित्रकलेतील विरुपीकरणाच्या प्रवाहाचा मागोवा घेतानाच त्यातील भारतीय प्रवाहांचे धागेदोरे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘पाश्‍चात्य चित्रकार पिकासो आणि फ्रान्सीस बेकन या चित्रकारांपासून विरुपीकरणाचा प्रवाह सुरू होतो. प्रचलित चित्रकलेतील ॲनाटॉमीसह दृश्‍यात्मकतेची सर्व बंधने झुगारून विरुपीकरण होत असते. या पाश्‍चात्त्य चित्रकारांपासून प्रेरणा घेऊन भारतातीतल तय्यब मेहता, एफ. एन. सुझा, एम. एफ. हुसेन, रझा, आरा अशा प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या मंडळींनी विरुपीकरणातील नवे भारतीय प्रवाह प्रस्थापित केले. जोगेन चौधरी, बिकाश भट्टाचार्य, सुनील दास, भुपेन खक्कर, भारती खेर, सुरेंद्र नायर, मंजुनाथ कामत, जगन्नाथ पांड्या अशा अनेक चित्रकारांनी ही वाट अधिक प्रशस्त केली. बडोदा, बंगाल, बॉम्बे स्कूलसारख्या चळवळींमधून हा प्रवाह अधिक घट्ट झाला. विरुपीकरण माणसाच्या भावविश्‍वाला प्रतिबिंबित करते. चित्र-शिल्पकलेतील ही विरुपाची प्रक्रिया चित्रबद्ध अथवा शिल्पबद्ध करताना कलावंताच्या प्रतिभेला आव्हान असते. दृश्‍यकलेतील हे विरुपीकरण सर्वच कला, साहित्यात उमटते. माणसाच्या अंतर्मनाच्या पातळीवरील भावभावनांचे प्रतिबिंबित बऱ्याचदा विरुपीकरणाच्या माध्यमातून प्रगट होते.’’

ते म्हणाले,‘‘कलावंतांचे हे व्यक्त होणे नैसर्गिक होते. सत्ता किंवा आमिषांना झुगारून तो व्यक्त होत असतो. आज फॅसिझमचा नव्याने सर्वत्र धोका दिसतो. त्याविरोधात आपापल्या पातळीवर व्यक्त होणे खूप गरजेचे आहे. फॅसिझमवाद कोणत्या पक्षाशी निगडित  नसून समाजाच्या सर्व क्षेत्रांना तो व्यापत आहे. चित्रकार, पत्रकार, प्राध्यापक, कार्यकर्ते अशा प्रत्येकानेच आपली भूमिका धाडसाने मांडली पाहिजे.’’

प्राचार्य बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले. यावेळी  प्रा. गौतमीपुत्र कांबळे, प्रा. सुरेश पंडित यांच्यासह कलामहाविद्यालयातील आजी- माजी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: sangli news fasizam oppose artist