सांगली जिल्ह्यात पन्नास लाख क्विंटल साखर उत्पादन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

सांगली - यावर्षीचा ऊस गाळपाचा हंगाम कोणत्याही आंदोलनाशिवाय वेळेवर सुरू झाल्यामुळे जानेवारीच्या अखेरपर्यंत साखर निर्मितीचा ५० लाख क्विंटलचा टप्पा पार झाला आहे. आतापर्यंत ४४ लाख ५० हजार टन उसाचे गाळप झाले

सांगली - यावर्षीचा ऊस गाळपाचा हंगाम कोणत्याही आंदोलनाशिवाय वेळेवर सुरू झाल्यामुळे जानेवारीच्या अखेरपर्यंत साखर निर्मितीचा ५० लाख क्विंटलचा टप्पा पार झाला आहे. आतापर्यंत ४४ लाख ५० हजार टन उसाचे गाळप झाले असून, सरासरी उतारा ११.६३ इतका आहे. उतारा हा या घडीला चिंतेचा विषय नसला तरी यंदा सरासरी साडेबारा उतारा 
गाठणार का, याकडे लक्ष असणार आहे. 

जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांत २४ जानेवारीअखेरच्या गाळप, उताऱ्याचा अहवाल तयार झाला आहे. त्यात साखराळे येथील लोकनेते राजारामबापू पाटील साखर कारखान्याने गाळप आणि उताऱ्यात आघाडी घेतली आहे. सहकारी ११ आणि चार खासगी, असे एकूण १५ कारखाने यंदा गाळप करत आहेत.

आतापर्यंत ५१ लाख ७३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन 
झाले आहे. ‘राजारामबापू’त ५ लाख ५१ हजार टन उसाचे गाळप झाले. ६ लाख ७४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. उतारा १२.२२ टक्के आहे. ‘राजारामबापू’ने उतारा सव्वाबाराच्या घरात नेला आहे; मात्र अन्य कारखान्यांची सरासरी मिळून साडेअकरा आहे. यंदा ती चिंतेचा विषय ठरण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. सरासरी १ टक्का उतारा वाढण्यासाठी आता पुरेसा कालावधी नाही. त्यामुळे उताऱ्यात सरासरीपेक्षा घट होईल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून आम्ही शेतकऱ्यांत जागृती केली. ९० टक्के ऊस ८६०३२ जातीचा आहे. नव्याने ८००५ आणि १०००१ जाती लावल्या जात आहेत. ०२६५ ऊस पूर्णपणे बंद झाला आहे. साखर उतारा आणि लावणी कार्यक्रमाची तंतोतंत अंमलबजावणी केल्याने उतारा आणि गाळपात सुधारणा झाली आहे. साखर कारखान्यांचा उतारा कमी असला तरी अन्य उत्पादने, को-जनरेशनमधून साखरेला चांगला दर देता येईल.

-  पी. आर. पाटील, अध्यक्ष, राजारामबापू साखर कारखाना

उतारा मुद्दाम कमी दाखवतात - पाटील
यावर्षी साखर उताऱ्यात घट होण्याची शक्‍यता लक्षात आल्याने शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथराव पाटील यांनी घणाघाती आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘‘दर कमी आले म्हणून कारखानदारांनी बिले थांबवली आहेत. सरासरी दरावर अंतिम दर ठरला पाहिजे. सुगीतील दराच्या तुलनेत भाव देण्याची प्रथा मोडीत काढली पाहिजे. काही कारखानदार उताऱ्यावर दर द्यावा लागत असल्याने कमी उतारा दाखवत आहेत. ही एक प्रकारची चोरी आहे.’’

*कारखाना        *गाळप (लाख टन) *साखर ( लाख क्विंटल) *उतारा (टक्के) 

 • *वसंतदादा (श्री दत्त इंडिया) सांगली *३.८५ *४.२९ *११.१४
 • *राजारामबापू (साखराळे) *५.५१ *६.७४ *१२.२२
 • *विश्‍वास (शिराळा) *३.६५ *४.२२ *११.५७
 • *हुतात्मा (वाळवा) *३.५६ *४.२७ *११.९७
 • *माणगंगा (आटपाडी) *०.५७ *०.४९ *८.४८
 • *महांकाली (कवठेमहांकाळ) *१.२६ *१.३० *१०.३४
 • *राजारामबापू (वाटेगाव) *३.४३ *४.१५ *१२.०८
 • *सोनहिरा (वांगी) *४.९४  *५.८३ *११.८१
 • *क्रांती (कुंडल) *४.४७ *५.२८ *११.८१
 • *मोहनराव शिंदे (आरग) *२.३८ *२.६८ *११.२४
 • *सर्वोदय (कारंदवाडी) *२.५८ *३.११ *१२.०७
 • *दालमिया (निनाईदेवी) (कोकरूड) *१.०४ *१.२३ *११.८५
 • *केन ॲग्रो (रायगाव) *१.६८ *१.९०  *११.३०
 • *उदगिरी शुगर (उदगिरी) *२.६२ *२.९६ *११.३०
 • *श्री श्री श्री (राजेवाडी) *२.९४ *३.२७ *११.१५
 • एकूण...  ४४.५०...५१.७३...११.६३
Web Title: Sangli News Fifty lakh quaintal Sugar production