फूटपाथ झाले ‘फूड पाथ’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

सांगली - ‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ सारखी स्थिती शहरातील हातगाडेवाल्यांनी करून टाकली आहे. ज्याला जिथे जागा मिळेल त्याने तेथे गाडे उभे करून धंदा थाटला आहे. परिणामी फूटपाथचे फूड पाथ झाले आहेत. ‘पाच रुपयांची पावती’ आणि एखाद्या नगरसेवकाचा आशीर्वाद एवढीच या अतिक्रमणाची  किंमत आहे. पादचाऱ्यांनी कुठे जायचे...? अर्थात, हा ज्याला चालायचे त्याचा प्रश्‍न आहे. 

राम मंदिर चौक ते काँग्रेस भवन, पुष्पराज चौक ते मिरजेतील गांधी चौक, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, एसटी स्थानक परिसर, शिवाजी मंडळ रोड ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत. पेव्हिंग ब्लॉक बसवून चकचकीत  केलेल्या फूटपाथवर गाडे उभे राहिले आहेत. कुणी चायनिज विकतो, कुणी भेळ करतो, कुणी दाबेली विकतो, तर कुणी फळांचा स्टॉल लावला आहे. चहा आणि भजी कुठेही चालते, अशीच स्थिती आहे. हे केवळ विद्रुपीकरण आहे, असे नाही. या अतिक्रमणाचा भयानक त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागतोय. शहरातील रस्ते अरुंद आहेत.  चारचाकी, दुचाकी वाहनांची प्रचंड वर्दळ वाढलीय. पायी जाणाऱ्याने फूटपाथवरून खाली पाय ठेवला तर तो  सुरक्षित आहे का, अशी भीती वाटते.

मूठभर लोकांची या फूड पाथने सोय होत असेल, मात्र शेकडो लोकांना त्याचा त्रासच होतोय. पुष्पराज चौकातून मार्केट यार्डपर्यंतची बांधीव गटार कशासाठी? तर ही गटार म्हणजे फळांचे स्टॉल लावण्याची हक्काची जागा झाली आहे. परिणामी, खरेदीदार भर रस्त्यावर वाहने उभी करतात, त्याचा पुन्हा त्रास. हे सारे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? रस्त्याकडेच्या दुचाकी बाहुबली स्टाईलने उचलून टेंपोत भरणाऱ्या पोलिसांच्या ठेकेदारांना हे दिसत नाही का? सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या डोळ्यावर कसल्या पट्टया बांधलेल्या आहेत, असे कैक प्रश्‍न उपस्थित होतात. 

खाऊगल्लीचा पर्याय
सांगलीची खाद्यसंस्कृती मोठी आहे. लोकांची ती गरजसुद्धा आहे; मात्र त्यासाठी अशा विखुरलेल्या हातगाड्यांना ‘खाऊगल्ली’चा पर्याय उत्तम ठरू शकतो. शहरात एक किंवा दोन ठिकाणी अशी सोय करून या साऱ्या विखुरलेल्या गाडेवाल्यांना तेथे जागा द्यायला हवी.

Web Title: sangli news food encroachment