भूमी पॉपकॉर्न कंपनीविरोधात १० लाखांच्या फसवणुकीची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 डिसेंबर 2017

सांगली - पैसे गुंतवा आणि त्याच्या बदल्यात आकर्षक व्याज किंवा प्लॉट देण्याचे आमिष दाखवून दहा लाखांची फसवणूक केल्याची तक्रार ‘भूमी पॉपकॉर्न प्रा. लि.’ या कंपनीविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. इनामधामणी येथील सुशीला सुभाष पाटील यांनी ही तक्रार दिली.

सांगली - पैसे गुंतवा आणि त्याच्या बदल्यात आकर्षक व्याज किंवा प्लॉट देण्याचे आमिष दाखवून दहा लाखांची फसवणूक केल्याची तक्रार ‘भूमी पॉपकॉर्न प्रा. लि.’ या कंपनीविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. इनामधामणी येथील सुशीला सुभाष पाटील यांनी ही तक्रार दिली.

पोलिसांनी माहिती दिली की, पुष्पराज चौकात भूमी पॉपकॉर्न प्रा. लि. कंपनीचे कार्यालय आहे. इनाम धामणीतील मनोज सुखदेव कदम याची ही कंपनी आहे. लोकांकडून पैसे घेऊन त्या बदल्यात आकर्षक व्याजाचे आमिष दाखविले जाते. ठराविक मुदतीनंतर मूळ रक्कम परत दिली जाते किंवा तेवढ्या किमतीचा प्लॉट देण्याचे आमिष दाखविले जाते. या कंपनीत पैसे गुंतविण्याबाबत मनोज कदमने सुशीला पाटील यांना भुरळ घातली. त्यामुळे त्यांनी या कंपनीत स्वत:च्या नावे पाच लाख रुपये आणि स्नुषा सन्मती विद्यासागर पाटील यांच्या नावे पाच लाख रुपये असे एकूण दहा लाख रुपये गुंतविले होते.

वर्षासाठी गुंतवणुकीची चर्चा झाली असताना त्याने सहा वर्षांसाठी गुंतवणूक केल्याचे प्रमाणपत्र दिले. त्याला जाब विचारला असता त्याने केवळ रेकॉर्ड दाखविण्यासाठी सहा वर्षे घालवली. तुम्हाला वर्षाने मूळ रक्कम परत देतो, तसेच प्रत्येक महिन्याला १२ टक्‍क्‍यांनुसार हजार रुपये व्याज देतो, असे त्याने सांगितले होते. २८ एप्रिल २०१४ ला हे पैसे गुंतविले होते. 

मनोज कदमने २८ मे २०१४ ते २८ मे २०१५ पर्यंत दर महिन्याला होणारे व्याज दिले. मात्र त्यानंतर त्याच्याकडे मुद्दलीची मागणी केली. त्याने जमीन विक्रीचा व्यवहार झाल्यावर पैसे देतो, असे सांगून तोवर व्याज घेण्यास सांगितले. ऑगस्ट २०१५ पर्यंतचे व्याजाचे पैसे दिले. मात्र त्यानंतर त्याने व्याज देणे बंद केले. त्याच्याकडे मुद्दल मागितली असता त्याने टोलवाटोलवी सुरू केली. पैसे भरून चार वर्षे होऊनही त्याच्याकडून काहीच हालचाली होत नसल्याने संबंधितांकडे पैशांची मागणी करूनही त्यांनी काहीच प्रत्युत्तर दिले नाही. अखेरीस सुशीला पाटील यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस तपास 
करीत आहेत. 

Web Title: Sangli News fraud complain against Bhumi Popcon