तासगावच्या युवाशक्‍ती संस्थेत ४१ लाखांचा अपहार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

तासगाव - येथील युवाशक्‍ती मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेत ४१ लाख २१ हजार ३७८ रुपयांचा अपहार केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांच्यावर संगनमताने शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा तासगाव पोलिसात दाखल झाला. संस्थेचा पत्ता तासगावचा, अध्यक्ष, उपाध्यक्ष मिरजेचे आणि तर कार्यस्थळ शिवनाकवाडी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) आहे. 

तासगाव - येथील युवाशक्‍ती मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेत ४१ लाख २१ हजार ३७८ रुपयांचा अपहार केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांच्यावर संगनमताने शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा तासगाव पोलिसात दाखल झाला. संस्थेचा पत्ता तासगावचा, अध्यक्ष, उपाध्यक्ष मिरजेचे आणि तर कार्यस्थळ शिवनाकवाडी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) आहे. 

युवाशक्‍ती मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था ही कागदोपत्री तासगावच्या पत्त्यावर नोंदणी केलेली संस्था आहे. या संस्थेच्या लेखापरीक्षणात संस्थेने करावयाच्या प्रकल्पासाठी सभासदांकडून गोळा करावयाच्या पाच टक्‍के रकमेपासून घोटाळा केल्याचे निदर्शनास आले. संस्थेचे लेखापरीक्षण झाल्यानंतर सभासदांची पाच टक्‍के वर्गणी ३० लाख ३ हजार ५०० रुपये गोळा केल्याचे दाखवून बॅंक ऑफ इंडियाच्या मालगाव शाखेत मुदतठेव ठेवली. लगेचच तारण कर्ज म्हणून २७ लाख रुपये सभासदांना भागभांडवल म्हणून काढले. याचा अर्थ संस्थेने पाच टक्‍के रक्‍कम गोळा केली नसल्याचे दिसते.

त्यानंतर संस्थेच्या इमारतीत विद्युतीकरणाच्या कामासाठी इचलकरंजीच्या हनुमान इलेक्‍ट्रीकल्स अँड इंजिनिअर्स यांना ३३ लाख ५० हजार रुपये दिल्याचे दाखवून ती रक्‍कम हडप केली. प्रत्यक्षात हनुमान इलेक्‍ट्रीकल्स यांना रक्‍कम मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. संस्थेच्या प्रकल्पाची जागा शिवनाकवाडी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथे आहे. या जागेच्या विकासासाठी वेळोवेळी रक्‍कम काढल्याचे व प्रत्यक्षात काम झाले नसल्याचे स्पष्ट झाल्याने संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष  आणि सचिवांविरोधात लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी पोलिसात फिर्याद दिली.

युवाशक्‍ती मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था नावाची संस्था स्थापन करून करण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी सभासदांकडून पाच टक्‍के रक्‍कम जमा न करता शासनाकडून अनुदानाची मागणी केली. मिळालेले अनुदान व्यक्‍तिगत लाभासाठी वापरले, संस्थेच्या  इमारतीत विद्युतीकरणासाठी रक्‍कम दिली नसताना खोटी नोंद करून ३३ लाख ५० हजार रुपये, फॅक्‍टरी इमारत बांधकामासाठी खोटी बिले करून ४ लाख ८८ हजार ९५३ आणि जमीन विकासासाठी खोटी बिले तयार करून २ लाख ८१ हजार ४२५ रुपयांचा अपहार केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष गौतम भगवान कांबळे (कसबे डिग्रज, ता. मिरज) उपाध्यक्ष कुमार गणपती कांबळे (कवठेपिरान, ता. मिरज), सचिव आबा जोमा निउंगरे (गणेशनगर गल्ली, गंगानगर इचलकरंजी) अशा तिघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या अध्यक्ष गौतम कांबळे यांचे निधन झाले आहे. तासगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा  दाखल झाला आहे. तासगाव पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Sangli News Fraud in Yuvashakti