येवलेवाडीजवळ ज्वालाग्राही इंधनाची पाईपलाईन फोडली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

कडेगाव/वांगी -  येवलेवाडी (ता. कडेगाव)च्या हद्दीत अज्ञातांनी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या मुंबई - पुणे - सोलापूर या मुख्य पेट्रोलियम पाईपलाईनला ड्रील मशिनने छिद्र पाडून व्हॉल्व्ह, चेंबर व पाईपच्या मदतीने डिझेल व पेट्रोलच्या चोरीचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हजारवाडी (ता. पलूस) येथील कंपनीच्या कंट्रोल रूमला सूचना मिळाल्याने व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला.

कडेगाव/वांगी -  येवलेवाडी (ता. कडेगाव)च्या हद्दीत अज्ञातांनी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या मुंबई - पुणे - सोलापूर या मुख्य पेट्रोलियम पाईपलाईनला ड्रील मशिनने छिद्र पाडून व्हॉल्व्ह, चेंबर व पाईपच्या मदतीने डिझेल व पेट्रोलच्या चोरीचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हजारवाडी (ता. पलूस) येथील कंपनीच्या कंट्रोल रूमला सूचना मिळाल्याने व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला. रविवारी (ता. १६) पहाटे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. निमेश प्रदीप सिंग (सांगली) यांनी चिंचणी-वांगी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अजून कोणालाही अटक झालेली नाही.

पोलिसांनी माहिती दिली की, येवलेवाडीपासून काही अंतरावर अंकुश यशवंत जगताप यांच्या मालकीची गट नं. २०५ ही जमीन आहे. त्यांच्या शेतातून हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची मुंबई - पुणे - सोलापूर ही मुख्य पेट्रोलियमची पाईपलाईन गेली आहे. पाईपलाईनमधून मुंबई - पुणे - सोलापूर व्हाया हजारवाडी असा पेट्रोल, डिझेल व केरोसीनचा उच्चदाबाने पुरवठा होतो. या पाईपमधील पेट्रोलियम पदार्थांची चोरी होऊ नये म्हणून या पाईपलाईनसोबत सेन्सर केबलही टाकली आहे. तसेच कंपनीने ठिकठिकाणी सुरक्षारक्षकही नेमले आहेत; तर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे हजारवाडी येथे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातील मुख्य कंट्रोल रूमचा या पेट्रोलियमच्या पाईपलाईनवर २४ तास वॉच असतो.

शनिवारी पहाटे सेन्सरच्या मदतीने हजारवाडीतील कंपनीच्या कंटोल रूमला मुंबई - पुणे - सोलापूर या पाईपमधील पेट्रोलियम पदार्थाचा दाब कमी झाल्याचे नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले; तर येवलेवाडीपासून काही अंतरावर अंकुश यशवंत जगताप यांच्या मालकीच्या गट नं. २०५ मधील जमिनीत पाईपलाईनजवळून जाणाऱ्या काही ग्रामस्थांना डिझेल व पेट्रोलचा वास येऊ लागला. त्यांनी कंपनीचे पर्यवेक्षक मोहन शिंदे यांना माहिती दिली. श्री. शिंदे यांनी पाहणी केली असता अज्ञातांनी इंधन चोरीच्या उद्देशाने जमीन खोदून मुख्य पेट्रोलियम पाईपलाईनला ड्रील मशीनने छिद्र पाडून त्यावर चेंबर व व्हॉल्व बसवल्याचे व चेंबरला पाईप बसवून पाईप जमिनीत चर काढून गाडून मुख्य पाईपलाईनपासून २४ मीटर लांब आणल्याचे समजले. अशा रितीने येथून पेट्रोल, डिझेल व केरोसीनची चोरी करण्याचा डाव अज्ञातांनी रचला असल्याचा प्रकार उघडकीस आला.

श्री. शिंदे यांनी कंपनीचे वरिष्ठ प्रबंधक प्रदीपकुमार, किरण अर्जुन वाघंबरे, निमेश प्रदीप सिंग यांना माहिती दिली. कंपनीचे सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चिंचणी-वांगी पोलिसांनाही माहिती दिली. सहाय्‍यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्यासह पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. 

पोलिसांनी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान, अत्यावश्‍यक वस्तुंची चोरी करणे अधिनियम कायद्यांतर्गत अज्ञातांविरुद्ध चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असला तरी कोणत्याही प्रकारे पेट्रोलियम पदार्थांची चोरी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीचा प्रयत्न करणारे पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. सहायक पोलिस निरीक्षक सोनवलकर तपास करीत आहेत. दरम्यान, हजारवाडी येथील नियंत्रण कक्षातून यासंदर्भात कोणतीही माहिती वा खुलासा मिळाला नाही. संपर्क साधला असता तेथे कोणीही अधिकारी नसल्याचे सांगण्यात आले.     

दरम्यान, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांनी येवलेवाडी येथे मुंबई - पुणे - सोलापूर ही मुख्य पेट्रोलियमची पाईपलाईन पूर्ववत बंदिस्त करण्यास सुरवात केली आहे. 

जिवावर बेतणारे चोरट्यांचे धाडस 
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या पाईपलाईनमधून अतिज्वालाग्राही पेट्रोल, डिझेल व केरोसीनचा उच्च दाबाने पुरवठा केला जातो, तरीही अज्ञातांनी या मुख्य पाईपलाईनला वेल्डिंग कसे केले? ज्वालाग्राही पदार्थ पाईपलाईनमधून जातो, अशा सूचना ठिकठिकाणी असताना छिद्र पाडण्याचे धाडस कसे केले? अनर्थ होऊन मोठ्या स्फोटाचीही शक्‍यता होती, अशी घटनास्थळी चर्चा होती.

Web Title: Sangli news fuel pipeline broken near yevalewadi