गणेशोत्सवापूर्वी पालिका क्षेत्र अतिक्रमणमुक्त करा - महापौर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

सांगली - येत्या गणेशोत्सवापूर्वी महापालिका क्षेत्र अतिक्रमणमुक्त करा, असे आदेश आज महापौर हारुण शिकलगार यांनी दिले. अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आज महासभेत मोठे रणकंदन झाले. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सांगलीतील लतीफ पठाण कॉलनीतील अतिक्रमणे हटवण्यात होत 

सांगली - येत्या गणेशोत्सवापूर्वी महापालिका क्षेत्र अतिक्रमणमुक्त करा, असे आदेश आज महापौर हारुण शिकलगार यांनी दिले. अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आज महासभेत मोठे रणकंदन झाले. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सांगलीतील लतीफ पठाण कॉलनीतील अतिक्रमणे हटवण्यात होत 
असलेल्या दिरंगाईविरोधात सभागृहात ठिय्या मारला. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महापौरांनी तत्काळ ते अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आणि प्रशासनाने त्याची अंमलबजावणीही केली. त्यानंतर मिरजेतील सातपुते गल्लीतील अतिक्रमण सुपारी घेऊन हटवल्याचा गंभीर आरोप गटनेते किशोर जामदार यांनी केला. असेच प्रकार अन्यत्र होत असल्याचे सदस्यांनी मांडले. त्यावरून अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्याचा पदभारच काढून घ्यायचा निर्णय झाला. अखेर सर्वच अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारीनिशी मोहीम सुरू करावी, असे आदेश महापौरांनी दिले. 

गेले वर्षभर पाठपुरावा करूनही अतिक्रमणे हटवली जात नाहीत. त्यामुळे आता ते हटेपर्यंत तुमच्यासमोरून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा महेंद्र सावंत यांनी महापौरांसमोर बैठक मारली. त्यानंतर राष्ट्रवादीचे सारे सदस्यही तिथे धावले. अखेर महापौरांनी महासभेतूनच आदेश देत पथक पठाण कॉलनीत धाडले. इकडे महासभा सुरू असताना तिकडे अतिक्रमण हटवले गेले. याउलट दोन दिवसांपूर्वी सकाळी लोकशाही दिनी निर्णय झाल्यानंतर सायंकाळी मिरजेतील सातपुते गल्लीतील अतिक्रमण हटवले गेले. हा प्रकार संशयास्पद असून आधीची अतिक्रमणे कायम ठेवून नेमके तेच हटवण्याचे कारण काय? नियम डावलून ही कारवाई का केली? आयुक्तांसमोर चर्चा करून निर्णय घ्या, या  विनंतीलाही दाद दिली नाही.

उलट उर्मट उत्तरे दिली, असा आरोप जामदार यांनी केला. जामदार यांचा रुद्रावतार पाहून सर्वच सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला. आयुक्तांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी घोरपडे यांचा पदभार काढून घेतला. 

यानिमित्ताने बिल्डरांची सुपारी घेऊन फेरीवाले रस्त्यावरून हटवले जातात, असा आरोप गौतम पवार यांनी केला. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा, अशी मागणी त्यांच्यासह प्रशांत मजलेकर यांनी केली. शेखर माने यांनी वर्षभरही अतिक्रमणेविरोधी मोहीम राबवा, अशी मागणी केली. त्यानंतर महापौरांनी गणेशोत्सवापूर्वी सर्व अतिक्रमणांविरोधात जोरदार मोहीम हाती घ्या, असे आदेश दिले. सदस्यांनी यात हस्तक्षेप  करू नये, शहर सुंदर करण्यासाठी ही मोहीम राबवावी असे सुचवले. 

त्या मालमत्ता ताब्यात घेणार
महापालिकेच्या विविध मालमत्ता भाड्याने देणे, खुल्या भूखंडाचा विकास, दिलेल्या जागांची भाडेवसुली करणे यासाठी धोरण ठरवण्याचा निर्णय महासभेत झाला. त्यासाठी विशेष महासभा घेण्याचाही निर्णय झाला. भाडे थकबाकीबद्दल महापौरांनी या जागा ताब्यात घ्यायचे आदेश दिले. त्याआधी अजेंड्यावरील भाडे तत्त्वाने द्यावयाच्या जागांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले.

सभेत महत्त्वाचे
रेरा कायद्यानुसार बांधकाम नियमावली बनवण्यासाठी विशेष बैठकीची गौतम पवार यांची मागणी
दोन महिन्यांत नवे बांधकाम नियम बनवून महासभेसमोर ठेवण्याची आयुक्तांची ग्वाही
अपुऱ्या पाणी पुरवठ्यावरून सदस्यांचा हल्लाबोल; अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर आसूड
जिल्हा सुधारच्या तक्रारीमुळे मिरजेतील रद्द कामांचा घेणार नव्याने आढावा
पाणी पुरवठा विभागाने नगरसेवकांच्या बदनामीची सुपारी घेतल्याचा दिग्विजय सूर्यवंशींचा आरोप
वॉन्लेसवाडी नाल्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रियंका बंडगर यांचा आक्रमक पवित्रा
एक ज अन्वये स्टेशन चौक सुशोभीकरणाचा शेखर माने यांचा प्रस्ताव मंजूर
बदली कामगारांना वारसा हक्काने भरतीचा बाळासाहेब गोंधळे यांचा प्रस्ताव प्रलंबित

Web Title: sangli news before ganesh festival municipal area will be free encroachment