न्यूनगंड नको, आत्मविश्‍वास बाळगा - गणेश टेंगले

बलराज पवार
सोमवार, 30 एप्रिल 2018

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ६१४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले गणेश टेंगले हे मूळचे जत तालुक्‍यातील दरीबडचीचे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. सांगलीत उच्च माध्यमिक आणि कोल्हापुरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या श्री. टेंगले यांनी तिसऱ्या प्रयत्नात ‘यूपीएससी’ उत्तीर्ण केली. यश मिळविताना अडचणीही आल्या. मात्र त्यावर मात करीत त्यांनी ‘यूपीएससी’मध्ये झेंडा कसा फडकविला, याबाबत त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला.

प्रश्‍न : ‘यूपीएससी’ उत्तीर्ण होणे, हा अनुभव कसा होता?
श्री. टेंगले : अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असताना स्पर्धा परीक्षा द्यायची, तीही ‘यूपीएससी’ची असे ठरविले. मुळात लहानपणापासून वर्तमानपत्रे वाचण्याची आवड होती. सामाजिक, राजकीय माहितीसोबत सामान्यज्ञानही वाढत गेले. दुसऱ्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत निवड झाली. एक ध्येय ठरवून गाठले.

प्रश्‍न : जतसारख्या दुष्काळी, ग्रामीण भागातून येत यश कसे मिळाले?
श्री. टेंगले : आमचा भाग कायम दुष्काळी असल्याने नोकरी, व्यवसाय करणे अवघडच. उत्तम शिक्षण घेऊन स्वत:चा मार्ग शोधणे महत्त्वाचे होते. स्पर्धा परीक्षा उत्तम पर्याय आहे. ग्रामीण, दुष्काळी पार्श्‍वभूमीचा बाऊ न करता यश मिळाले. कोण कुठून येतो याला नाही, तर स्वत:ला सिद्ध करणे महत्त्वाचे ठरते.

प्रश्‍न : मराठीतून शिक्षणाचा न्यूनगंड वाटला नाही?
श्री. टेंगले : ग्रामीण भागातून आलो, शहरी विद्यार्थ्यांसमोर कसे टिकणार, शिक्षण मराठीतून, इंग्रजी कसे जमणार? असा न्यूनगंड असतो. कुठे तरी कमी पडतो, असे वाटते. स्पर्धेत उतरला की मग न्यूनगंड ठेवण्याची गरज नाही. विचारही करू नये. जिद्दीने उतरावे. इंग्रजीतून मुख्य परीक्षा दिली. अडचणींवर मात केली. यश 
मिळाले. 

प्रश्‍न : मुलाखतीचा अनुभव कसा होता?
श्री. टेंगले : दुसऱ्यांदा मुलाखत झाली. विशेष म्हणजे सांगलीबद्दलच प्रश्‍न विचारले. सांगलीचे वैशिष्ट्य, हळदीची पेवं याची माहिती विचारली. सांगलीचे प्रसिद्ध क्रिकेटपटू कोण? मी स्मृती मानधनाचे नाव घेतले. पण त्यांनी ५०-६० वर्षांपूर्वीचे कोण असे विचारल्यावर विजय हजारे असे सांगितले. देवदासी पद्धतींबद्दल विचारले. त्यात जागृती होत असल्याचे सांगितले.

प्रश्‍न : उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रीयन उमेदवारांत काय फरक?
श्री. टेंगले : भाषा, माध्यमाचा फॅक्‍टर आहे. मात्र बाऊ करण्यासारखे नाही. त्यांच्याकडे कम्युनिकेशन स्कील्स चांगले असते. मराठीतून शिकलेले उमेदवारही मुलाखतीत यशस्वी होतातच. ‘सीबीएसई’, स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमांत फरक आहे. ‘सीबीएसई’च्या मुलांना बऱ्याच गोष्टी आधी शिकायला मिळतात. त्याचा त्यांना फायदा होतो.

प्रश्‍न : स्पर्धा परीक्षेला जाणाऱ्यांना काय सांगाल?
श्री. टेंगले : अभ्यासाची क्षमता, तयारी ओळखा. सुरुवातीला मार्गदर्शनासाठी क्‍लास लागतात. अभ्यास स्वत:च करावा लागतो. नऊ-दहा तास अभ्यास करायचो. स्पर्धा मोठी आहे. अपयशाने खचून न जाता जिद्दीने प्रयत्न करावा. कुठून आलो, काय आहोत याचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्‍वासाने सामोरे जावे.

Web Title: Sangli News Ganesh Tengale Interview