तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात सापडला गांजा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

तासगाव - तुरची (ता. तासगाव) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात चक्क गांजा सापडल्याने एका प्रशिक्षणार्थी पोलिसासह गांजा पुरविणाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. तासगाव पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना एक दिवसाच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

तासगाव - तुरची (ता. तासगाव) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात चक्क गांजा सापडल्याने एका प्रशिक्षणार्थी पोलिसासह गांजा पुरविणाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. तासगाव पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना एक दिवसाच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तुरची येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिस जतीन दत्ता कातकडे (रा. मुंबई) याच्याकडे सॅकमध्ये सिगारेटचे पाकीट सापडले. त्याच्याकडे आणखी काही आहे काय? म्हणून तो राहत असलेल्या खोलीची तपासणी केली असता त्याच्या बॅगेमध्ये ४७ ग्रॅम २९० रुपये किमतीचा गांजा मिळाला. 

हा गांजा तेथील स्वच्छता कर्मचारी जीवन श्रीपती कांबळे (रा. पलूस) हा पुरवत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या दोघांविरोधात तासगाव पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून दोघांनाही तासगाव न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थीसाठी आचारसंहिता, नियमावली असून त्याबाबत माहिती दिली जाते. हा प्रकार घडल्यानंतर तातडीने वरिष्ठांना माहिती दिली असून भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी काळजी घेत आहे.
- प्राचार्य संजय बारकुंड, 

   तुरची, पोलिस प्रशिक्षण केंद्र

दरम्यान तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात सध्या ६६४ पोलिस प्रशिक्षण घेत आहेत. या प्रकरणी सापडलेला जतीन कातकडे हा मूळचा नाशिकचा असून मुंबई येथून अनुकंपा तत्त्वावर पोलिस भरती झाला होता. त्याच्याकडे गांजा सापडल्यानंतर प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य संजय बारकुंड यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना माहिती दिली आणि तातडीने गुन्हा दाखल केला.

दरम्यान पोलिस प्रशिक्षण केंद्रात चक्क गांजा सापडल्याने खळबळ उडाली असून तेथील सुरक्षा आणि शिस्तीबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्या पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्थेची अपेक्षा करायची, त्यांचे प्रशिक्षण होत असताना असे प्रकार घडत असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. असे प्रकार घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.

Web Title: Sangli News Ganja found in Turchi Police training center