बाप्पांच्या विसर्जनाला भक्तांचा महापूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

सांगली - ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यात आला. घरगुती गणरायाच्या विसर्जनासाठी आज कृष्णाकाठी जणू भक्तांचा पूरच आला होता. लहानग्यांचा जल्लोष, महिला-पुरुषांची लगबग आणि मोरयाऽऽऽचा गजर अशा भक्तिमय वातावरणाने कृष्णाकाठ न्हाऊन निघाला. 

सांगली - ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यात आला. घरगुती गणरायाच्या विसर्जनासाठी आज कृष्णाकाठी जणू भक्तांचा पूरच आला होता. लहानग्यांचा जल्लोष, महिला-पुरुषांची लगबग आणि मोरयाऽऽऽचा गजर अशा भक्तिमय वातावरणाने कृष्णाकाठ न्हाऊन निघाला. 

कुंडात निर्माल्य टाकणे, मूर्तिदान आणि विसर्जनासाठी एकमेकांना हात देत सांगलीकरांनी  पर्यावरण पूरक विचार रुजल्याचे आणि शिस्तीचेही दर्शन घडविले. गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी घरगुती गणरायाचे  मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. त्यासाठी महापालिका प्रशासनासह विविध सेवाभावी संस्था, बोट क्‍लबचे कार्यकर्ते आणि पोहणाऱ्यांनी नदीकाठी व्यवस्था केली होती. श्री गणरायाच्या विसर्जनासाठी लोक चारचाकी, दुचाकी, रिक्षातून येत होते. टिळक चौकातून पुढे बाप्पांना निरोप देण्यासाठी उचलणारी पावले जड झाली होती. गौरी विसर्जनासाठी महिला, मुलींनी पारंपरिक वेशभूषा करून प्रचंड गर्दी केली होती. या धामधुमीत सार्वजनिक मंडळांच्या ‘श्रीं’चेही विसर्जन सुरू होते. गुलालाची उधळण, चिरमुऱ्याची उधळण करत नाचत-जल्लोष करत बाप्पांच्या निरोपाला तरुणाई लोटली होती. ढोल पथकांनी आजही साऱ्यांचे लक्ष वेधले. आज बहुतांश छोट्या मंडळांच्या ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. सजवलेले ट्रॅक्‍टर, डमडममधून मूर्ती आणल्या होत्या. 

कलेक्‍टर ऑफिसच्या गणरायाचे विसर्जन
विजयनगर येथील नव्या जिल्हाधिकारी कार्यालयात यंदा गणेशोत्सवाची धामधूम होती. आज महाप्रसाद आणि विसर्जन सोहळा करण्यात आला. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.

पंधरा मंडळांचे मूर्तिदान
गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी सायंकाळपर्यंत १५ मंडळांनी मूर्तिदान उपक्रम राबवला. रोटरी क्‍लब ऑफ कृष्णा व्हॅलीतर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. घरगुती गणेशाच्या सुमारे ३०० हून अधिक मूर्तिदान करण्यात आल्याचे अध्यक्ष ओंकार घोरपडे यांनी सांगितले.

Web Title: sangli news ganpati visarjan