सुवर्ण "कर' वाढीवर सुवर्णकार नाराज 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

सांगली - वस्तू व सेवाकर रचनेत (जीएसटी) सोन्यावर तीन टक्के कर लावण्याच्या निर्णयावर सराफांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 15 कोटींवर उलाढाल असलेल्या बड्या सराफ पेढ्यांसाठी "ठीक आहे', तर छोट्यांसाठी "जोर का झटका' आहे. त्याचा परिणाम म्हणून जीएसटी लागू झाल्यानंतर प्रति 10 ग्रॅम (एक तोळा) सोन्याच्या दरात सुमारे 600 रुपयांनी वाढ होणार आहे. 

सांगली - वस्तू व सेवाकर रचनेत (जीएसटी) सोन्यावर तीन टक्के कर लावण्याच्या निर्णयावर सराफांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 15 कोटींवर उलाढाल असलेल्या बड्या सराफ पेढ्यांसाठी "ठीक आहे', तर छोट्यांसाठी "जोर का झटका' आहे. त्याचा परिणाम म्हणून जीएसटी लागू झाल्यानंतर प्रति 10 ग्रॅम (एक तोळा) सोन्याच्या दरात सुमारे 600 रुपयांनी वाढ होणार आहे. 

नवी दिल्लीत काल जीएसटी समितीच्या बैठकीत कर रचनेवर काही निर्णय झाले. त्यात सोन्यावर तीन टक्के कराचा निर्णय घेण्यात आला. राज्यासह देशभरातील सराफ व्यापाऱ्यांनी नेमकी काय मागणी केली होती, अपेक्षा काय होत्या, याचा सांगलीतील सराफ व्यावसायिकांकडून कानोसा घेतला. त्यातही दुमत समोर आले. शहरातील सर्वांत मोठी सराफ पेढी असलेल्या पु. ना. गाडगीळ पेढीचे संचालक गणेश गाडगीळ यांनी तीन टक्के कराचे "इटस्‌ ओके' म्हणत स्वागत केले, तर पंडित सराफ पेढीचे संचालक व राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष किशोर पंडित यांनी "दोन टक्के अपेक्षित होते' असे सांगत नाराजीचा सूर आळवला. 

यामागचे प्रमुख कारण म्हणजे सध्या उलाढालीवर आधारित कर रचना होती. श्री. पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 कोटींवर उलाढाल असलेल्या पेढ्यांना 1.2 टक्के व्हॅटसह एक टक्का एक्‍साईज आणि 0.5 टक्के एलबीटी होता. त्यांच्यासाठी जीएसटीमुळे होणारी वाढ ही केवळ 0.3 टक्के इतकी आहे. छोट्या पेढ्यांना मात्र 1.2 टक्के व्हॅट आकारला जात होता. त्यांच्यासाठी ही वाढ तब्बल 1.8 टक्के इतकी असेल. अर्थात कर रचनेत आता सारे समान पातळीवर आल्याने सोन्याचा दर समानच वाढणार आहे. प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर 30 हजार रुपये असेल, तर त्यावर सुमारे 900 रुपये कर भरावा लागेल. साहजिकच छोट्या व्यापाऱ्यांना फटका बसेल, असा सूर आहे. 

असा होता कर 

* 15 कोटींवर उलाढाल ः 1.2 टक्के व्हॅट, 1 टक्का एक्‍साईज, 0.5 टक्के एलबीटी. 
* 15 कोटींपर्यंत उलाढाल ः 1.2 टक्के व्हॅट. अन्य करातून सूट. 

असा असेल जीएसटी 
* सर्वांना समान कर ः 3 टक्के. 

""सोन्यावर 3 टक्के जीएसटीचा निर्णय आमच्या दृष्टीने योग्य आहे. आम्हाला 2.25 ते 3 टक्के इतका अपेक्षित होता. तो 3 टक्के लागला. एकच कर असल्याने कागदोपत्री त्रास वाचेल.'' 

- गणेश गाडगीळ, संचालक, पु. ना. गाडगीळ सराफ. 

""कमी उलाढाल असलेल्या सराफ व्यावसायिकांसाठी खूपच जास्त कर आकारणी करण्यात आली आहे. ज्यांची उलाढाल मोठी, त्यांच्यासाठी हे ठीक आहे; परंतु छोट्यांना दणका बसणार आहे. कारण आम्हाला केवळ 1.2 टक्के व्हॅट भरावा लागत होता. आता जीएसटीमुळे एकूण वाढ 1.8 टक्के इतकी आहे.'' 

- किशोर पंडित, उपाध्यक्ष, राज्य सराफ, सुवर्णकार फेडरेशन. 

Web Title: sangli news gold GST