शिराळ्यात राजकीय सोयींनुसार आघाड्या

शिवाजीराव चौगुले
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

शिराळा - शिराळा तालुक्‍यातील ६० पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ५० ग्रामपंचायतींसाठी नेत्यांनी कंबर कसली असून त्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपापल्या सोयीचे राजकारण करत आघाड्या केल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक नातीगोती, भावकी आणि हितसंबंधावर आधारित असल्याने विजयासाठी सर्वांनाच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

शिराळा - शिराळा तालुक्‍यातील ६० पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ५० ग्रामपंचायतींसाठी नेत्यांनी कंबर कसली असून त्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपापल्या सोयीचे राजकारण करत आघाड्या केल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक नातीगोती, भावकी आणि हितसंबंधावर आधारित असल्याने विजयासाठी सर्वांनाच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. ग्रामपंचायतीची ही निवडणूक आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख यांच्यासाठी विधानसभेची रंगीत तालीम असणार आहे. 

या वेळी सरपंच निवड थेट जनतेतून असल्याने काहीही झाले तरी सरपंच आपल्या विचाराचा करण्यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. शिराळा तालुक्‍यातील राजकीय समीकरण हे नाईक आणि देशमुख घराण्याभोवती फिरत आहेत. त्या माजी आमदार मानसिंगराव नाईक व प्रदेश काँग्रेसचे  सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी काही ठिकाणी आघाडी करून भाजपला विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आघाडी पेक्षा आपले स्थानिक संबंध जोपासण्यासाठी आपापल्या सोयीप्रमाणे आघाडी केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक ही विधानसभेची रंगीततालीम असली तरी आपल्या विचाराच्या जास्तीत जास्त ग्रामपंचायती कशा होतील, याकडे नेत्यांनी आपले लक्ष केंद्रित करून तशा आघाड्या करण्यावर भर दिला आहे.

या वेळी पक्षापेक्षा भावकीची गणिते जुळवण्यात स्थानिक नेत्यांनी जास्त रस घेतला आहे. काही ठिकाणी पक्षांतर्गत असणारी धुसफूस नेत्यांना थांबवता आली नसल्याने एकाच पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या लोकांशी आघाडी करून आपल्या प्रतिस्पर्धाला गारद कसे करता येईल, याची व्यूहरचना आखू लागले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी नेत्यांना वेट अँड वॉच अशीच भूमिका बजावावी लागणार आहे. तालुक्‍यात आरळा, मणदूर, चरण, मांगरूळ, सोनवडे, येळापूर, देववाडी, मांगले, कांदे, सागाव, कणदूर, बिऊर, पाडळी, गुढे येथील लढती ह्या लक्षवेधी ठरणार आहेत.

 

Web Title: sangli news Grampanchayat Election