राष्ट्रवादी, भाजपमध्ये काट्याची टक्कर

रवींद्र माने
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

तासगाव -  तासगाव तालुक्‍यातील २६ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून, खासदार, आमदारांसह  तालुक्‍यातील दिग्गजांची प्रतिष्ठा अक्षरशः पणाला लागली आहे. २६ पैकी १ ग्रामपंचायत भाजपने बिनविरोध जिंकली असून, राष्ट्रवादीला ग्रामपंचायती टिकविण्यासाठी, तर भाजपला ग्रामपंचायती मिळविण्यासाठी तीव्र झुंज द्यावी लागत आहे. 

तासगाव -  तासगाव तालुक्‍यातील २६ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून, खासदार, आमदारांसह  तालुक्‍यातील दिग्गजांची प्रतिष्ठा अक्षरशः पणाला लागली आहे. २६ पैकी १ ग्रामपंचायत भाजपने बिनविरोध जिंकली असून, राष्ट्रवादीला ग्रामपंचायती टिकविण्यासाठी, तर भाजपला ग्रामपंचायती मिळविण्यासाठी तीव्र झुंज द्यावी लागत आहे. 

राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीला प्रत्येक निवडणूक म्हणजे ‘आव्हान’ म्हणून सामोरे जावे लागत आहे. आर. आर. आबांच्या नंतरच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखालील ही चौथी महत्त्वाची निवडणूक होत आहे. यापूर्वी ग्रामपंचायत, बाजार समिती आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत गड राखण्यात यश मिळाल्याने या ही निवडणुकीत आशावादी असलेल्या राष्ट्रवादीला नेहमीप्रमाणे गटबाजी आणि फुटाफुटीला सामोरे जावे लागत आहे. हीच मोठी समस्या राष्ट्रवादीला भेडसावत असल्याचे चित्र दिसत आहे. ही पडझड रोखून गड सांभाळण्याचे मोठे आव्हान या वेळी राष्ट्रवादीसमोर आहे. आबा नसल्याने राष्ट्रवादीची परिस्थिती विनासेनापती अशी आहे, त्यामुळे गावोगावच्या कार्यकर्त्यांवरच या निवडणुकीची जबाबदारी पडली आहे. 

भाजपने भैरववाडी ग्रामपंचायतीच्या रूपाने निवडणुकीत खाते खोलले आहे. खासदारांचा तालुक्‍यात गेली वर्षानुवर्षे ‘‘निष्ठावंत’’ असा स्वतःचा  एक मतदार आहे. मतदारांच्या या ताकदीवरच खासदार आतापर्यंत  निवडणुका जिंकत आले आहेत. त्याच ताकदीवर यावेळीही मैदान मारायचेच या इर्षेने निवडणुकीत भाजप उतरलेली दिसत आहे. मणेराजुरी, बस्तवडे, निमणी यासारख्या काही गावांमध्ये राष्ट्रवादीचा एक गट भाजपला मिळाल्याने ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या नाराजीलाही खासदारगटाला सामोरे जावे लागत आहे. या नाराजीचा फटका बसू नये याची काळजी घ्यावी लागत आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्यादृष्टीने ताकद दाखवून देण्याची ही निवडणूक बनली आहे.
    
टोकाची ईर्षा  
तासगाव तालुक्‍यातील दोन गटातील ईर्षा किती टोकाची आहे ? ते या निवडणुाकीतील प्रचारातून जाणवते, निवडणूक असलेल्या काही गावांमध्ये घराघरांवर आपापल्या पॅनेलचे चित्र, झेंडे, चिन्हे लावलेली दिसतात. अक्षरशः रेघ मारल्यासारखी दोन गटात गावे विभागली आहेत. उमेदवाराने दिलेल्या जेवणासाठी त्या त्या गटाचे मतदारच जाताना दिसत आहेत. प्रचंड इर्षेने एकेक मतासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत आहेत.

Web Title: Sangli News Grampanchayat Election