मत घितुय आन्‌ परत फिरकतबी न्हाय

मत घितुय आन्‌ परत फिरकतबी न्हाय

आष्टा - ‘ज्यो त्यो येतुय, अमुक करतो, तमुक करतो, गटार करतो, रस्ता करतो असं म्हंतुय, मत घितुय आन्‌ परत पाच वरसं फिरकतबी न्हाय, जवळनं गेला तर बोलतबी न्हाय, मत द्याचं पण चिन्हाचा कायतरी घोळ झालाय, एकच हुतं तवा दाबाय जमायचं. आता  प्रत्येकाला येगळं येगळं हाय, त्यामुळं अवघडल्यागत हुणार’ असा सूर गावागावांतल्या बुजुर्ग ज्येष्ठात दिसला. 

कृष्णा-वारणा नद्यांच्या दुआबातील पारावर अंतिम ऊस बिलाबरोबर गटा-तटाचं जुळलेलं, विस्कटलेलं गणित सरळ रेषेत आणण्याच्या गप्पा सुरू आहेत. नेत्याचं काय नाय, पण खालचं कार्यकर्तेच ऐकत नाहीत, त्यामुळं  इथलं सारं बिघाडलंय अशा चर्चा गावागावांत आहेत. मर्दवाडी (पूर्वीची मुडद्याची वाडी) बारमाही वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या काठावरील गाव. राष्ट्रवादीचे दोन, संघटनेचे दोन असे चार गट. फाळकेवाडीत रस्त्याकडेलाच शेतकरी झेंडू तोडण्यात व्यस्त होते. मतदान होईल दोन दिसाचं, 
पदरात आल्यालं पाडून घेतो’ 

असं म्हणीत निवडणुकीच्या चर्चेला त्यांनी बगल दिली. शिगावात कमानीखालीच लोकं ग्रुपनी हुती. त्यात चौकशी केली. ते म्हणाले,‘जनता वळकुन हाय. थेटला मातुर जोरात हुणार.’ फार्णेवाडी, ढवळीत शांतता दिसली. भडकंबेत मात्र डिजिटल बॅनर, बोर्ड, रिक्षांनी वातावरण टाईट होतं. सोसायटीच्या पुढेच सात-आठ जण होते.

फेटेवाल्या ७० वर्षांच्या अजोबाला विचारले,‘जोरं कुणाचा?’ ‘समदी येत्यात, तुमचाच म्हणायचं’ असं ते उत्तरले. पोखर्णीत दोन्ही गटात नव्यानं आवक-जावक झाल्याचं समजलं. बावचीत रकटे-कोकाटे पारंपरिक  संघर्ष आहे. बऱ्याच ठिकाणी मतापेक्षा राजारामबापू व हुतात्मा कारखान्याच्या अंतिम ऊसदराची चर्चा होती. एकूणच वाळवा तालुक्‍यातील गावागावांतलं राजकारण हादगा नक्षत्रासारखं गडगडाय लागलंय. पार्टी आघाडी असूनही व्यक्तिनिहाय चिन्हाने पेच वाढलाय. ते पटवून देताना उमेदवारांची दमछाक होत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com