सांगली जिल्ह्यात दिग्गजांनी गड राखले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सांगली - लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये भाजपच्या चौखूर उधलेल्या वारुला ग्रामपंचायत निवडणुकीत ब्रेक लागला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा घसरत निघालेला आलेख या निवडणुकीत सावरला आहे.

सांगली - लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये भाजपच्या चौखूर उधलेल्या वारुला ग्रामपंचायत निवडणुकीत ब्रेक लागला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा घसरत निघालेला आलेख या निवडणुकीत सावरला आहे.

जिल्ह्यातील सव्वाचारशेपैकी सुमारे साठ टक्‍क्‍यांहून अधिक ग्रामपंचायतींत काँग्रेस, राष्ट्रवादीने बाजी मारली आहे, मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच भाजपचे वारे गल्लीबोळात शिरले आणि त्याचा मिरजी, आटपाडी, तासगाव तालुक्‍यात प्रभावही दिसला. 

जिल्ह्यातील 453 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. पैकी 28 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. सव्वाचारशे ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. निकाल हाती येईल, तसा गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पतंगराव कदम यांच्या पलूस व कडेगाव तालुक्‍यांत काँग्रेसने चांगली कामगिरी करत भाजपला रोखले. तेथे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या गटापेक्षा दुप्पटीहून अधिक म्हणजे 30 पैकी 20 ग्रामपंचातींवर काँग्रेस समर्थकांनी झेंडा लावल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

वाळवा तालुक्‍यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीने दणकून कामगिरी केली आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने दमदार कामगिरी केली. प्राथमिक आकडेवारीनुसार 50 पैकी 37 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने झेंडा रोवला. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला 6 ग्रामपंचायती मिळाल्या. शिराळ्यात राष्ट्रवादीने झेंडा रोवला आहे. भाजपला 16, राष्ट्रवादीला 22 तर कॉंग्रेसकडे 8 ग्रामपंचायती गेल्या आहेत. 

जत तालुक्‍यात विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्या समर्थकांवर काँग्रेसने कडी करत 33 ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली आहे. भाजपला 16 तर राष्ट्रवादीला 2 ग्रामपंचायतींत यश मिळाल्याचे आकडे आहेत. खानापूर तालुक्‍यात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना चांगलाच धक्का बसला असून कॉंग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. तेथे कॉंग्रेसला 24, शिवसेनेला 21 ग्रामपंचायती मिळाल्याचे पहिल्या टप्प्यात समजते. 

मिरज तालुक्‍यात भाजपने चांगली कामगिरी केली आहे. तेथे भाजप तीन गटात विखुरला असला तरी कॉंग्रेसला फारसे यश आलेले नाही. सलगरे ग्रामपंचातीचा अपवाद वगळता कॉंग्रेस तेथे झगडताना दिसली. आमदार सुरेश खाडे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, खासदार संजय पाटील यांच्या समर्थकांनी चांगली कामगिरी केली आहे. 

तासगाव तालुक्‍यात खासदार संजय पाटील समर्थक भाजपने चांगली कामगिरी करत दिवंगत आर. आर. पाटील गटाला तगडी लढत दिली आहे. भाजपने 16 तर राष्ट्रवादीने 10 ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला आहे. कवठेमहांकाळमध्ये घोरपडे समर्थकांनी 11, शिवसेनेने 1 तर राष्ट्रवादीने 4, कॉंग्रेसने 3 आणि भाजपने 8 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. खासदार संजय पाटील यांनी आपला स्वतंत्र गट बांधल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

Web Title: Sangli News Grampanchayat Election Result