मिरज तालुक्‍यात गावगाड्याचे सुकाणू उच्चशिक्षितांच्या हाती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

मिरज - तालुक्‍याच्या गावगाड्याचे सुकाणू मतदारांनी हुशार सरपंचाच्या हाती सोपवल्याचे निकालाअंती दिसून आले आहे. नव्याने निवड झालेले बहुतांश सरपंच पदवीधर असल्याचे सुखद निरीक्षण आहे.

मिरज - तालुक्‍याच्या गावगाड्याचे सुकाणू मतदारांनी हुशार सरपंचाच्या हाती सोपवल्याचे निकालाअंती दिसून आले आहे. नव्याने निवड झालेले बहुतांश सरपंच पदवीधर असल्याचे सुखद निरीक्षण आहे. यातील काहीजण ग्रामपंचायतीवर पुन्हा निवडले  गेले आहेत तर काहीजण अन्य सार्वजनिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. तेथील अनुभवाच्या शिदोरीवर  आपापल्या गावांना विकासाच्या वाटेवर नेण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. 

शासनाने सरपंचपदासाठी किमान सातवी उत्तीर्णची अट घातली होती. भविष्यात ती बारावी होण्याची चर्चा गावोगावी सुरू झाली; त्यामुळे सर्वांनीच सुशिक्षित उमेदवार निवडण्याकडे लक्ष दिले. परिणामी बहुतांश गावांना पदवीधर आणि द्विपदवीधर सरपंच मिळाले  आहेत. बेडगच्या सरपंच रूपाली शिंदे यांनी बीएड्‌ची पदवी घेतली आहे. बोलवाड ग्रामपंचायतीची सत्ता एकहाती मिळवणारे सुहास पाटील यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. टाकळीचे जहाँगीर जमादार उच्चशिक्षित आहेत. त्यांना सरपंचपदी दुसऱ्यांदा गावकऱ्यांनी संधी दिली आहे. खंडेराजुरीच्या सरपंचपदी दुसऱ्यांदा आरूढ झालेले गजानन रुकडे हेदेखील  पदवीधर आहेत. नरवाडच्या सरपंच राणी नागरगोजे यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 

संतोषवाडीचे सरपंच हणमंतराव गायकवाड हे पदवीधर आहेत; शिवाय विकास सोसायटीचे अध्यक्ष आहेत. या राजकीय आणि सामाजिक अनुभवाच्या जोरावर गावाची सूत्रे ते सांभाळतील. बेळंकीचे सरपंच राजाराम  गायकवाड यांनी पदवीचे शिक्षण घेतले आहे. बामणोलीच्या राजेश सनोळींनी बारावीचे तर सिद्धेवाडीच्या रामचंद्र वाघमोडे यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. 

शिक्षणाबरोबरच अनुभवही मोठा
काही नव्या पदाधिकाऱ्यांकडे शिक्षणाबरोबरच अनुभवाचे गाठोडेही वजनदार आहे. मानमोडीचे सरपंच सुरेश गायकवाड यांचा राजकीय अनुभव दीर्घ पल्ल्याचा आहे. यापूर्वी त्यांनी ग्रामपंचायतीत उपसरपंच, सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. सध्या सोसायटीचे अध्यक्षही आहेत. सिद्धेवाडीच्या रामचंद्र वाघमोडे यांनी पदवीनंतर नोकरीच्या मागे न लागता सुरू केलेला रोपवाटिकेचा व्यवसाय तालुक्‍यात नावारूपाला आला आहे. कानडवाडीचे अनिल शेगुणशी यांचा राजकीय अनुभवही जोरदार आहे.

सोनीचे सरपंच राजेंद्र माळी यांनी जिल्हा परिषदेत कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती म्हणून यशस्वी कामगिरी पार पाडली आहे. सलगरेचे तानाजी पाटील यांनी तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तीनही स्तरावर झेंडा फडकावला आहे. प्रशासनावरची त्यांची पक्की मांड ग्रामपंचायतीला नव्या टप्प्यावर नेईल असा गावकऱ्यांचा विश्‍वास आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायतींकडे कोट्यवधींचा निधी येऊ लागला आहे. त्यामुळे सरपंचांची जबाबदारी वाढली  आहे. अशावेळी मतदारांनी गावगाड्याचे सुकाणू  जबाबदार हाती देण्याचा शहाणपणा दाखवल्याचे दिसून आले आहे. तालुक्‍यातील बहुतांश महिला सरपंच मात्र दहावीच्या आत-बाहेरच आहेत.

Web Title: Sangli News Grampanchayat Sarpanch Election