कोलकात्याच्या द्राक्ष दलालाकडून १२ शेतकऱ्यांना २३ लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

तासगाव - तासगाव तालुक्‍यातील मणेराजुरी, सावळज परिसरातील १२ द्राक्ष उत्पादकांना तब्बल २३ लाख ६७२ रुपयांचा गंडा घालून, कोलकात्याचा दलाल पळून गेला. हा प्रकार नुकताच घडला. तासगाव पोलिस ठाण्यात या शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे. गेल्याच आठवड्यात तब्बल ५० लाखांची फसवणूक करून दिल्लीचा दलाल पळाला होता. त्याचा अजून तपास लागलेला नाही. 

तासगाव - तासगाव तालुक्‍यातील मणेराजुरी, सावळज परिसरातील १२ द्राक्ष उत्पादकांना तब्बल २३ लाख ६७२ रुपयांचा गंडा घालून, कोलकात्याचा दलाल पळून गेला. हा प्रकार नुकताच घडला. तासगाव पोलिस ठाण्यात या शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे. गेल्याच आठवड्यात तब्बल ५० लाखांची फसवणूक करून दिल्लीचा दलाल पळाला होता. त्याचा अजून तपास लागलेला नाही. 

यावर्षी द्राक्ष दलालांकडून फसवणूक करून पळून जाण्याचा हा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. कोलकाता येथील एम. डी. सलीम नावाच्या दलालाने मणेराजुरीतील एका मध्यस्थाच्या वतीने ठिकठिकाणची द्राक्षे खरेदी केली. मणेराजुरीतील सहा, सावळजच्या पाच आणि वज्रचौंडेतील एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याकडून सुरवातीला खरेदी केलेल्या द्राक्षांचे रोख पैसे देऊन या शेतकऱ्याचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर घेतलेल्या द्राक्षांचे पैसे आज देतो, उद्या देतो, असे म्हणून पोबारा केला. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आला.

एम. डी. सलीम तासगावात दत्तमाळावर खोली भाडेतत्त्वावर घेऊन राहत होता. त्याने खरेदी केलेली द्राक्षे कोलकत्ता बाजारात पाठवत असे. त्याच्याशी दूरध्वनीवर संपर्क बंद झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर हवालदिल शेतकऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तासगाव पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी अजून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

या दलालाने मणेराजुरीतील शेतकऱ्यांकडून १३ लाखांची, तर सावळजच्या शेतकऱ्यांची साडेआठ लाख आणि वज्रचौंडे येथील एका शेतकऱ्याकडून अडीच लाखांची द्राक्षे खरेदी केली. त्याने मणेराजुरीतील ज्या मध्यस्थाच्या ओळखीने द्राक्षे घेतली, त्याचीही फसवणूक केली आहे. आज दिवसभर शेतकरी तासगाव पोलिस ठाण्यात बसून होते.

यावर्षीचा फसवणुकीचा हा दुसरा प्रकार आहे. पंधरवड्यात मणेराजुरी व परिसरातील शेतकऱ्यांना ५० लाखांची फसवणूक करून दिल्लीतील दलाल पळून गेल्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा २३ लाखांच्या फसवणुकीने द्राक्ष उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे. यावर्षी फक्‍त मणेराजुरीतील शेतकऱ्यांची आतापर्यंत ५२ लाखांची फसवणूक झाली आहे. गेल्या वर्षीही ४० लाखांची फसवणूक अशाच प्रकारे द्राक्ष दलालांकडून झाली होती. 

दक्षता हाच उपाय...
द्राक्षबागायतदारांनी द्राक्षे विकताना काळजी घेण्याची गरज आहे. दोन्ही फसवणूकीमध्ये शेतकऱ्यांकडे दलालांच्या दूरध्वनी क्रमांकांशिवाय द्राक्ष विकल्याचा कोणताही पुरावा नाही, हे स्पष्ट झाले आहे. दलालाचे पूर्ण नाव, दुकान व घरचा पत्ता, दलाल बागेत आल्याचे, त्याच्याबरोबरील संभाषणाचे, वाहनांचे क्रमांक असे पुरावे असणे आवश्‍यक आहे.

Web Title: Sangli News grape broker from Kolkatta fraud issue