गारपिटीने 2000 एकरांतील द्राक्षबागांना फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

तासगाव - तालुक्‍यातील येळावीसह परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या गारपिटीने दोन हजार एकर द्राक्षबागांना फटका बसला. छाटणीनंतर आलेले फुटवे नष्ट झाले. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त बागांची पाहणी केली.

तासगाव - तालुक्‍यातील येळावीसह परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या गारपिटीने दोन हजार एकर द्राक्षबागांना फटका बसला. छाटणीनंतर आलेले फुटवे नष्ट झाले. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त बागांची पाहणी केली.

मंगळवारी रात्री वादळी वारे, गारांच्या पावसाने येळावी, निमणी, बांबवडे, आमणापूर, तुर्ची आणि पलूसच्या काही बागांना झोडपून काढले. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास सुरू झालेल्या गारपिटीने झालेले नुकसान सकाळी लक्षात येताच द्राक्ष बागायतदार हतबल झाल्याचे चित्र होते.

येळावीतच दोन हजार एकरांवर द्राक्षबागा आहेत. याच भागात गारपीट झाली. हंगामांनंतर छाटणीनंतर फुटलेले फुटवे, डोळे, पाने गारपिटीत नष्ट झाल्याने फेरछाटणीशिवाय पर्याय उरलेला नाही. नव्याने छाटणी घेऊनही पुढीलवर्षीच उत्पादन येईल. त्याची खात्री नसल्याने बागातयदार हबकून गेले आहेत. 

दरम्यान, द्राक्षबागयतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे यांच्यासह संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला. बागांवर फवारावयाच्या औषधांविषयीची चर्चा केली.

गारपिटीमुळे दोन - सव्वादोन हजार एकर बागांचे कमी अधिक नुकसान झाले आहे. फेरछाटणीशिवाय पर्याय राहिला नाही. उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे.
- सुभाष आर्वे,
अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ 

गारपीट झालेल्या बागांना पीक विम्याचा फायदा मिळण्याची मागणी केली आहे. येळावी परिसरातील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे त्वरित पंचनामे व्हावेत.
- विशाल पाटील,
माजी पंचायत समिती सदस्य

Web Title: Sangli News Grape farm damaged due to stormy rains